हम सब एक है; सर्वच पक्षातील बडे नेते जामिनावर अन् राजकारणात सक्रिय!

हम सब एक है; सर्वच पक्षातील बडे नेते जामिनावर अन् राजकारणात सक्रिय!

मुंबई : राज्यात गेले काही महिने नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडतच आहेत. त्यासोबतच काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय घटनाही घडल्या आहेत. त्यात तथ्य किती हे न्यायालयात सिद्ध होईल, अशी अपेक्षा आहे. पण त्यात सर्वच पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक पक्षाचा एक तरी नेता तर, जामिनावर बाहेर आहे.

एसोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्मस् (ADR) ही संस्था प्रत्येक निवडणुकीचे विश्लेषण करते. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवाराची आर्थिक स्थिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी, शिक्षण, कुटुंबातील सदस्य याचा तपशील ही संस्था देते. या संस्थेच्या अहवालानुसार राज्यात 285पैकी 177 आमदारांवर (62 टक्के) विविध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 114 आमदारांवर (40 टक्के) गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. राज्यातील काही नेते जामिनावर बाहेर आहेत.

जितेंद्र आव्हाडांची जामीनावर मुक्तता
आता भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मंगळवारी ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्याच्या दोन दिवसआधी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाडांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणातही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

संजय राऊतांना दिलासा
गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने 9 नोव्हेंबर रोजी जामीन मंजूर केला. खासदार संजय राऊत हे 100 दिवसांहून अधिक काळ जेलमध्ये होते. त्यांना आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

राणे पिता-पुत्राला जामीन
भाजपा आमदार नितेश राणे हे देखील जामिनावर बाहेर आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या वेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांना हा जामीन मिळाला होता. तर, त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन प्रकरणात जामीन मिळाला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजपा आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याशिवाय, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांना कोर्टाने गेल्या वर्षी जामीन मंजूर केला आहे.

राज ठाकरे देखील जामीनावर
वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केले होते. गेल्यावर्षी वाशी न्यायालयाने या प्रकरणात राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. याशिवाय, प्रक्षोभक भाषणांसह विविध प्रकरणांमध्येही त्यांना वेळोवेळी जामीन मिळाला आहे.

राहुल गांधीही जामीनावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भिवंडी कोर्टात दाखल केलेल्या मानहानी खटल्यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना 2016मध्ये वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, देशभरात गाजत असलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी देखील 2015मध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे.

छगन भुजबळांना आधी जामीन, नंतर क्लीनचिट
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. नंतर 2018मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर केला. नंतर या प्रकरणात गेल्यावर्षी क्लीनचिट देण्यात आल्याने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त झाले आहेत.

First Published on: November 17, 2022 6:07 PM
Exit mobile version