भाजप नेत्यांचा जळगावमध्ये पुन्हा वाद; उन्मेश पाटील यांची उमेदवारी अडचणीत

भाजप नेत्यांचा जळगावमध्ये पुन्हा वाद; उन्मेश पाटील यांची उमेदवारी अडचणीत

जळगाव मतदारसंघाचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील (फोटो सौजन्य - उन्मेश यांच्या फेसबुक वॉलवरुन)

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना जळगावमधील भाजप नेत्यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मात्र आता या वादाचा फटका जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांना बसू शकतो. कारण उन्मेश पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार भाजपचे नेते कैलास सुर्यवंशी यांनी दाखल केली आहे. त्यामुळे आता उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप सुर्यवंशी यांनी केला आहे.

उमेदवारीसाठी जळगावमध्ये वाद

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघासाठी भाजप कडून ए. टी. पाटील यांना उमेदवारी दिली गेली होती. या दोन्ही निवडणुकीत ए. टी. पाटील निवडूण आले होते. परंतु, आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी भाजपने रद्द केली. भाजपकडून ही उमेदवारी स्मिता वाघ यांना देण्यात आली. त्यामुळे ए. टी. पाटील नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेत भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार बी. एस. पाटील देखील उपस्थित होते. त्यांनी देखील उदय वाघ यांच्यावर टीका केली.

काही दिवसांनी भाजपने स्मिता वाघ यांची देखील उमेदवारी रद्द करत उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. बी. एस. पाटील यांच्या प्रयत्नामुळे आपली पत्नी स्मिता वाघ यांचे लोकसभेचे तिकीट कापले गेले असा समज उदय वाघ यांनी करुन घेतला. याशिवाय बी. एस. पाटील यांनी भर प्रचारसभेत स्मिता वाघ यांच्याबाबत आक्षेपार्य वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप-सेना यांच्या अमळनेर येथील मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांध्ये मोठा राडा झाला. उदय वाघ यांनी बी. एस. पाटील यांना मारहाण केली. यात गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की झाली. भाजप नेत्यांचे हे प्रकरण फार गाजले. त्यानंतर पुन्हा आता जळगावच्या भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

First Published on: April 22, 2019 1:52 PM
Exit mobile version