भाजपकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी; नाना पटोलेंचा आरोप

भाजपकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी; नाना पटोलेंचा आरोप

भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच करत आहे हे वारंवार उघड झाले आहे. ईडी सारखी तपास यंत्रणा तर थेट भाजपाची शाखा असल्यासारखीच काम करत आहे. राजकीय नेत्यांवर कारवाईसाठी गैरवापर करण्यात येत असलेल्या ईडीची धमकी आता भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरातील मतदारांनाच दिली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

भाजपाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील मतदारांना तुमची ईडीकडून चौकशी होईल अशी धमकी दिली हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाचा जनाधार घसरला आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत भाजपाला महाराष्ट्राच्या जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणार हे निश्चित आहे. भाजपाला कोल्हापुरात पराभव दिसत असल्याने निराशेपोटी चंद्रकांत पाटील यांनी थेट मतदारांनाच धमकी दिली आहे. काही लोक पेटीएमच्या माध्यमातून पैसे वाटत असून तुम्ही ते पैसे घेतले तर त्याची चौकशी ईडीकडून केली जाऊ शकते अशी धमकी देण्यात आली आहे. आता ईडी हजार-पाचशे रुपयांची चौकशी करणार का? आणि ती चौकशी भाजपाच्या इशाऱ्यावर होणार का?

ईडी, आयकर, सीबीआय यांचा मागील सात वर्षात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर वाढला असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्ता मिळाली नसल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या नैराश्येतून ते केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन भितीचे वातावरण निर्माण करत आहेत. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असतात. कोल्हापुरची स्वाभिमानी जनता मात्र या पोटनिवडणुकीतही चंद्रकांत पाटील व भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असेही पटोले म्हणाले.

 

First Published on: April 4, 2022 6:02 PM
Exit mobile version