कपबशीचं बटण दाबलं तरी भाजपालाच मतदान – सुजात आंबेडकर

कपबशीचं बटण दाबलं तरी भाजपालाच मतदान – सुजात आंबेडकर

राज्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. अशामध्ये अनेक मतदारसंघामध्ये ईव्हीएममशीमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामध्येच सोलापूरात वंचित आघाडीच्या चिन्हासमोर बटण दाबलं की कमळालाच मतदान होत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी देखील हाच आरोप केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हासमोरील बटण दाबल्यास ते कमळाला मत जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी मशीन सील केल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर आणि सुजात आंबेडकर यांनी आज मतदान केले. मतदान करुन आल्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन राज्यातील अनेक ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीनसंबंधित अनेक तक्रारी आल्या असल्याचा आहेत. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसंच ईव्हीएम मशीन खराब झाल्यास मतदानाची वेळ वाढवण्यात यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

First Published on: April 18, 2019 1:41 PM
Exit mobile version