भास्कर जाधवांची मालकाला खूश करण्यासाठी महिलेवर अरेरावी, आशिष शेलार यांची टीका

भास्कर जाधवांची मालकाला खूश करण्यासाठी महिलेवर अरेरावी, आशिष शेलार यांची टीका

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर असताना महिलेवर अरेरावी केली याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. भास्कर जाधव यांनी महिलेवर केलेली अरेरावी मालकाला खूश करण्यासाठी होती असा घणाघात भाजप आमदार आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये दाखल झाले होते. यावेळी भास्कर जाधव यांनी स्थानिक नागरिकांशी गैरवर्तन केले असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला या वेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव आपल्या मालकाला खूश करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. जाधवांनी विधानसभेत गैरवर्तन केलं आणि आता रविवारी जाहीर कार्यक्रमातही त्यांनी गैरवर्तन केलं अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे झालेली दुर्घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने या आपत्तींवर दीर्घकालीन तोडगा आणि तात्काळ मदत करायला पाहिजे. परंतू राज्य सरकार मदत करण्यामध्ये कुचराई करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्राने दिलदारी दाखवली पाहिजे तशीच बॉलिवूडनेही दाखवली पाहिजे याला आम्ही सहमत असल्याचेही आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

शिवसेनेनं सत्तेत राहून मुंबईकरांशी गद्दारी

दरम्यान मुंबईत पाऊस पडल्यावर तुंबई होते यावरुन आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सत्तेत राहून एवढे वर्ष मुंबईकरांशी गद्दारी केली आहे. आज २६ जुलै मुंबईकरांच्या लक्षात राहणारा दिवस आहे. अनेक वर्ष गेली परंतू अद्यापही मुंबईची परिस्थिती तशीच आहे. १६ वर्षाच्या कालावधीत कोट्यावधी प्रकल्पांच्या नावाखाली ३ लाख २० हजार कोटींचा खर्च मुंबईत करण्यात आला आहे. एवढा खर्च करुनही मुंबईची परिस्थिती तीच आहे. यामुळे ते पैसे कुठे गेले याचे उत्तर शिवसेनेला जनतेला द्यावे लागणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधवांची अरेरावी

राज्यात मुसळधार पावसाने मोठा हाहाकार घातला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक भागात अजूनही पाऊस सक्रिय आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे मोठं नुकसान झाले आहे. महाडमध्ये दरड कोसळली तर चिपळूण, संगली आणि कोल्हापूर अद्यापही पाण्याखाली आहे. पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला आणि या नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या दरम्यान गर्दी पांगवताना आमदार भास्कर जाधव यांची अरेरावी कॅमेऱ्यात टिपली असून सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: July 26, 2021 2:44 PM
Exit mobile version