आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल – देवेंद्र फडणवीस

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल – देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पहाटेच्या शपथविधीच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. पण फडणवीस आणि अजितदादांची खेळी फार काळ टिकाव धरु शकली नाही आणि त्यांची ही सत्ता अल्पजीवी ठरली. आज वर्षपूरतीच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर भाष्य केले. आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असे विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी फडणवीस औरंगाबादमध्ये आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे. ठाकरे सरकार हे बेईमानी करुन आलेले सरकार आहे. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल हे माहित नाही. पण यावर आता बोलणे योग्य नाही. मात्र, यापुढे पहाटे शपथ घेणार नाही तर योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्ताबदल होईल, असे विधान केले होते. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक विधानानंतर पुन्हा एकदा राज्यातील सत्ताबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

First Published on: November 23, 2020 1:24 PM
Exit mobile version