आता घोटाळा अशोक चव्हाणांचा, ५४ कोटी कुठल्या मंत्र्यांचे?; सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल

आता घोटाळा अशोक चव्हाणांचा, ५४ कोटी कुठल्या मंत्र्यांचे?; सोमय्यांचा ठाकरे सरकारला सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील अनेक खुलासे केले. तसेच भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील बुलढाणा सहकारी पतसंस्थाचे १२०० बेनामी अकाऊंट ५४ कोटींची बेनामी संपत्ती कुठल्या मंत्र्यांची असा सवाल ठाकरे सरकारला केला. शिवाय ठाकरे सरकार जवाब दो, असे किरीट सोमय्या म्हणाले.

त्यानंतर किरीट सोमय्यांनी ट्वीट करत एक पत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे की, ‘सप्टेंबर महिन्यात बुलढाणा येथील बुलढाणा सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते. आतापर्यंत १२०० हून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होत आहे. या खात्यांद्वारे ५३.७२ कोटी मनी लाँड्रिंग करण्यात आली. या पतसंस्थेत सापडलेले ५३.७२ कोटी रुपये कुणाचे?’

याबाबत सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना एक प्रश्न विचारायचा आहे, बुलढाणा सहाकारी पतसंस्थेतले १२०० बेनामी अकाऊंट ५३.७२ कोटी रुपये कुणाचे कुठल्या मंत्र्यांचे आहेत? अशोक चव्हाण यांचा या बेनामी व्यवहाराशी संबंध आहे का? एकाबाजूला आयकर विभागाने धाडी घातल्या. त्यात अशोक चव्हाण यांचे सहकारी प्रशांत निलावर दुसरे चार्ट अकाऊंटर जयंत शहा, सहकारी पतपेढीचे अध्यक्ष राधेश्याम चाडंक, काकानी, नांदेड धर्माबाद येथील शाखेचे नावे समोर आली आहेत. आता हा घोटाळा अशोक चव्हाणांचा का?’

दरम्यान बुलढाणा पतसंस्थाद्वारा ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना ७० कोटी कर्ज देखील अशाच अपारदर्शक पद्धतीने देण्यात आल्याचेही कळत आहे, असे सोमय्यांनी सांगितले. या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्या उद्या दिल्ली येथे जाणार आहेत. दिल्लीत सहकार मंत्रालय, ईडी, आयकर विभाग अशा विभिन्न अधिकाऱ्यांच्या भेटी सोमय्या घेणार आहेत. शिवाय शुक्रवारी या घोटाळ्यासंदर्भात सोमय्या बुलढाणा येथे सुद्धा जाणार आहेत. त्यानंतर ते नांदेड येथे जाणार आहेत.


हेही वाचा – अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, हायकोर्टाने १२ नोव्हेंबरपर्यंत सुनावली ईडी कोठडी


 

First Published on: November 7, 2021 2:49 PM
Exit mobile version