एक सच्चा, निष्ठावंत कार्यकर्ता हरवला, आशिष शेलारांनी गिरीश बापटांना वाहिली श्रद्धांजली

एक सच्चा, निष्ठावंत कार्यकर्ता हरवला, आशिष शेलारांनी गिरीश बापटांना वाहिली श्रद्धांजली

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. भारतीय जनता पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने एक सच्चा, निष्ठावंत, कडवट कार्यकर्ता हरवला आहे, अशा शब्दांत भाजपा मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी शोक व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात कोणी कार्यकर्ता बनायला तयार नव्हतं, तेव्हापासून गिरीश बापट पक्षासाठी उभे होते. आज पक्षाला मोठं जन समर्थन मिळत असतानाही ते आपल्यासोबत कायम होते. त्यांनी मोठा प्रवास ‘याची देही याची डोळा’ असा पाहिला. ते स्वतः एकनिष्ठ ध्रुव ताऱ्यासारखे राहिले. गिरीश बापट सांस्कृतिक कार्यमंत्री होते; त्यावेळी सभागृहाच्या कामांमध्ये त्यांनी आम्हा सर्व नवीन आमदारांना मार्गदर्शन केले. त्यांनी उभारणीच्या सुरुवातीच्या काळात केलेल्या भरीव मदतीमुळे आज मी उभा राहू शकलो. ते सर्वांना मदतीसाठी कायम तत्पर असायचे. त्यांनी पुण्याहून आणलेली भाकर सगळ्यांसाठी असायची, असं आशिष शेलार म्हणाले.

पुण्यात त्यांच्या घरी गेल्यावर जुने किस्से सांगून ते आठवणीत रमायचे. त्यांच्यासोबत घालवलेले सगळे प्रसंग आजही डोळ्यासमोर उभे राहतात. कसब्याच्या पोटनिवडणुकीत स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता पक्षासाठी आवश्यक ते सगळं त्यांनी केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे. आमच्या सगळ्यासाठी हे खूपच दुःख देणारे आहे, अश्या शब्दांत आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गिरीश बापटांची कारकीर्द काय?

कसबा पेठ विधानसभेतील किंगमेकर म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख होती. ते मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिले आहेत. नगरसेवक पदापासून स्वतःच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. पुढे १९९५ साली पहिल्यांदा त्यांनी आमदारकीची निवडणूक लडवली. त्यानंतर सलग पाच वेळा ते कसबा पेठेत आमदार म्हणून राहिले.

१९९६ साली गिरीश बापटांनी लोकसभेसाठीही नशिब आजमावलं होतं. परंतु, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये त्यांनी लोकसभेसाठी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव केला.


हेही वाचा : भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन, 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


 

First Published on: March 29, 2023 5:16 PM
Exit mobile version