अनिल देशमुखांनाही भाजपकडून ऑफर; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

अनिल देशमुखांनाही भाजपकडून ऑफर; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जाण्याआधी भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे. वर्ध्यातील एका कार्यक्रमात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावर शरद पवार पुढे म्हणाले की, अनिल देशमुखांच्या जवळच्या लोकांवर 130 वेळा धाडी घातल्या जातात, देशात असा प्रकार कुठेही घडला नाही. देशमुखांना एकच सांगितले जात होते की, तुम्ही पक्ष बदला, विचार बदला आणि नेतृत्त्व बदला. पण त्यांनी स्वच्छ मनाने सांगितले की, मी संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवेन पण माझ्या पक्षाची साथ सोडणार नाही. त्यावेळी देशमुखांनी ती ऑफर धुडकावल्याने त्यांना तुरुंगवास झाला, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

यावेळी अनिल देशमुखांनी देखील त्यांचे तुरुगांतील आणि राज्याच्या राजकारणातील अनुभव शेअर केले. यावेळी अनिल देशमुखांनी एक अनुभव शेअर करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांपूर्वीच पडले असते पण माझा साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मी आयुष्यभर जेलमध्ये जाईन पण समझोता करणार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले. तसेच आर्थर रोड कारागृहात जिथे दहशतवादी कसाबला डांबले होते तिथे डांबून माझ्यावर तडजोडीसाठी दबाव आणला गेला, असा मोठा खुलासा अनिल देशमुखांनी केला आहे.

यापुढे अनिल देशमुख म्हणाले की, ईडी, सीबीआयच्या भीतीने अनेक आमदार पक्षबदल करुन गेले. माझ्यावरही सातत्याने दबाव आणला जात होता. माझ्यावर 100 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले, पण आरोपपत्रात माझ्यावर केवळ 1 कोटी 71 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला, माझा छळ करण्यात आला, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो. अखेर न्यायदेवतेने मला न्याय दिला, न्यायालयाने माझ्याविरोधात पुरावे नसल्याचे स्पष्ट केले.

अनिल देशमुखांच्या या आरोपांवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही अनिल देशमुखांना कोणताही प्रस्ताव दिला नव्हता. उलट देशमुखांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोनवेळा आम्हाला तसा प्रस्ताव पाठवला होता. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले, अनिल देशमुख यांची आताही जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे निर्दोष असल्याचे पुरावे आणि कागद त्यांनी ईडीला दाखवावेत, असही महाजन खोचकपणे म्हणाले.

अनिल देशमुखांना मुंबईबाहेर जाण्यास परवानगी

अनिल देशमुख यांना विशेष सीबीआय आणि विशेष पीएमएलए न्यायालयाने चार आठवडे मुंबईबाहेर जाण्यास परवानगी दिली आहे. यानंतर अनिल देशमुख तब्बल 21 महिन्यांनंतर नागपुरात दाखल झाले, त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी नागपूर विमानतळापासून ते त्यांच्या घरापर्यंत जय्यत तयारी केली होती. विमानतळाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी केली होती. यानंतर फुलांनी सजवलेल्या गाडीतून देशमुखांची मिरवणूक काढण्यात आली, तसेच चौकाचौकात अनेकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.


हेही वाचा : बलात्कार पीडितेच्या दाव्याने न्यायालयही चक्रावले; वकील तपासणार सत्य

First Published on: February 13, 2023 5:17 PM
Exit mobile version