Rajya Sabha bypolls : भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला, राज्यसभा पोटनिवडणूकीतून घेणार माघार

Rajya Sabha bypolls : भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला, राज्यसभा पोटनिवडणूकीतून घेणार माघार

भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांना महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करुन देत पोटनिवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली होती. अखेर भाजपने उमेदवारी माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून पोटनिवडणूकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसंची विनंती भाजपकडून मान्य करण्यात आली असल्यामुळे आता रजनी पाटील बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या जागेवर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपचे संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाल्यास ती निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीसांना महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करुन देत निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याची विनंती केली आहे. यावर फडणवीस यांनी कोर कमिटीशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असा शब्द दिला होता.

रजनी पाटील यांचा मार्ग मोकळा

भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणूकीतील अर्ज माघे घेण्यात आल्यामुळे रजनी पाटील यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांच्याविरोधात भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु भाजपने उमेदवारी माघे घेतली असल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्य प्रदेशमधील रिक्त जागांवर राज्यसभा पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या पोटनिवडणूकीचे मतदान ४ ऑक्टोबरला होणार असून निकालही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.

रजनी पाटील यांचा परिचय

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील या राज्यसभेच्या माजी खासदार आहेत. तसेच सध्या त्यांच्याकडे जम्मू काश्मीरची प्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे. रजनी पाटील या १९९६ साली बीडमधून लोकसभेवर निवडून आल्या आहेत. तर रजनी पाटील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेतून केली आहे.


हेही वाचा : शेतकऱ्यांच्या भारत बंदला राहुल गांधींचा पाठिंबा; भाजपवर डागलं टीकास्त्र


 

First Published on: September 27, 2021 1:04 PM
Exit mobile version