यंदाच्या पावसाळ्यात ५० हजार झाडे लावणार, पालिका उद्यान खात्याचा नवा संकल्प

यंदाच्या पावसाळ्यात ५० हजार झाडे लावणार, पालिका उद्यान खात्याचा नवा संकल्प

संग्रहित छायाचित्र

मुंबईत सध्या विविध प्रकारची ३३ लाख झाडे आहेत. गतवर्षी चार लाख झाडे लावण्यात आली. तर यंदाच्या पावसाळयात ५० हजार झाडे लावण्याचा पालिका उद्यान खात्याचा संकल्प आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राणीच्या बागेत मलेशियाचे राजदूत अहमद झुवेरी युसुफ आणि जपानचे राजदूत फुकहोरी यसुकता यांच्या उपस्थितीत २०० झाडे लावण्यात आली. यामध्ये, कांचन आणि चाफा वृक्षांची त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात लागवड केली. यावेळी विद्यार्थ्यांशीही दोन्ही देशांच्या राजदूतांनी संवाद साधला. तसेच यंदाच्या पर्यावरण दिनाच्या मोहीमेसाठी पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

नागरी वनीकरण मोहीमेला सुरूवात

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून यंदाच्या नागरी वनीकरण मोहीमेला सुरूवात करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली.

येत्या चार महिन्यांच्या कालावधीत मुंबईतील २४ विभागांमध्ये स्थानिक प्रजातीचे वृक्ष लागवड हे स्थानिक लोकांच्या सहभागाने तसेच बिगर शासकीय संस्था आणि सामाजिक दायित्व जबाबदारी (सीएसआर)च्या माध्यमातून लावण्यात येतील, अशी माहिती उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

जल अभियंता विभागाच्या जागांमध्येही वृक्ष लागवड करण्यात येणार

बहावा, अंजन, बकुळ, कांचन, अर्जुन, ताम्हण, बिवळा, आवळा, चिंच, आंबा, वड, पिंपळ, मोह, उंबर, पुतरंजिया यासारखी विविध स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड या मोहीमे अंतर्गत करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, विद्यार्थी, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून ही वृक्ष लागवड करण्यात आली. येत्या काळात मुंबईतील वनीकरण वाढवण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय नौदल तसेच अन्य विभागांच्या जागा शोधून त्याठिकाणी वनीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच महापालिकेच्या अखत्यारितील जल अभियंता विभागाच्या जागांमध्येही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.


हेही वाचा : IMD : महाराष्ट्राला मान्सूनची अजून एक आठवड्याची प्रतीक्षा; चक्रीवादळाचा फटका


 

First Published on: June 5, 2023 11:07 PM
Exit mobile version