बांधकाम मजुरांना मोफत आरोग्य सुविधा; बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्सचा उपक्रम!

बांधकाम मजुरांना मोफत आरोग्य सुविधा; बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्सचा उपक्रम!

नागपूरच्या क्वेटा कॉलनीमध्ये पाटीदार भवनात बांधकाम कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरात लिव्हर, किडनी, ह्रदय, थायरॉईड, मूत्र, मलेरिया, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोळे, कान इत्यादींची तपासणी करण्यात आली. या प्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय, संजय अवचट, नरसी पटेल, सुनील सूर्यवंशी, अरविंद गुज्जनवार, नरेश पौनीकर, किशोर दुधे, राजेश संगेवार देखील हजर होते.

कामाच्या ठिकाणचे वातावरण आरोग्यासाठी त्रासदायक असणारा व्यवसाय म्हणजे बांधकाम व्यवसाय. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. पूर्णवेळ सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याच्या संपर्कात राहिल्यामुळे या मजुरांना श्वसनाचे आजार होत असतात. वजन उचलण्याच्या कामामुळे अनेक शारिरीक व्याधीदेखील जडतात. त्यामुळे अशा मजुरांचे सरासरी आयुष्य कमी होत असल्याचे देखील दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा मजुरांसाठी आरोग्यविषयक तपासणीची नवी सुविधा आता उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ही तपासणी मोफत केली जाणार आहे. बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्सतर्फे एचएलएल लाईफकेअर लिमिटेड आणि हिंदलॅब्जच्या मदतीने या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल.

काय असेल या हेल्थ सर्व्हिसमध्ये?

एचएलएलतर्फे करण्यात येणाऱ्या या सर्व्हिसमध्ये शारिरीक तपासणी, फुफ्फुस तपासणी, आवाजाची तपासणी, रक्ततपासणी, साखरेचे प्रमाण, यकृत तपासणी, मलेरिया, इएसआर, हिमोग्लोबिन, टी ३-टी ४ टीएसएच तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातील. यासाठी सर्व बांधकाम मजुरांना इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्ड देण्यात येईल. या कार्डमध्ये त्या मजुराची आरोग्यविषयक माहिती साठवून ठेवली जाईल, जी कधीही आणि कुठेही पाहाता येईल. या कार्डांवर संबंधित मजुराचा फोटो देखील असेल. याशिवाय, ज्या मजुरांना गंभीर आजार असल्याचे तपासणीमध्ये दिसून येईल, त्यांना जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रावर नेण्यात येईल. रुग्णांच्या सोयीसाठी कॉल सेंटर आणि हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शनकडून पुरवल्या जाणाऱ्या या सुविधांमुळे मजुरांच्या आरोग्यामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतात.

या सुविधेचे विशेष काय?

मोफत आरोग्य सुविधा पुरवणारे हे कॅम्प बांधकाम मजुरांना कमीत कमी प्रवास करावा लागेल इतक्या अंतरावर किंवा शक्य झाल्यास थेट बांधकामाच्या ठिकाणीच उभे केले जातील. जर कॅम्प लांब असतील, तर मजुरांच्या नेण्याची आणि आणण्याची सोय केली जाईल. अशा केंद्रांमध्ये बसण्याची व्यवस्था आणि स्टॉल असतील. असे कॅम्प उभारण्याआधी त्याची प्रसारमाध्यमांत रीतसर जाहिरात देखील केली जाईल. ज्यांची नोंदणी आधी होऊ शकली नाही, अशा मजुरांना थेट केंद्रावर देखील नोंदणी करता येणार आहे. अशा कॅम्पवर मजुरांची नाश्त्याची सोय देखील केली जाणार आहे. गेल्या २ वर्षांपासून एचएलएलकडून अशा प्रकारे बांधकाम मजुरांना आरोग्यविषयक सुविधा देण्याचं काम विविध राज्यांमध्ये केलं जात आहे. अशी सेवा पुरवण्यासाठीचं कुशल मनुष्यबळ आणि लॅबदेखील त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे अशा आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त बांधकाम मजुरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्सकडून करण्यात आले आहे.

First Published on: August 26, 2019 9:59 AM
Exit mobile version