उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश

उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश

उर्मिला मातोंडकर अडकली 'शिवबंधनात'

बॉलिवूडमधील रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. यानंतर या अभिनेत्रीने राजकारणात देखील दमदार पाऊल ठेवले. आता बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर शिवबंधनात अडकली आहे. उर्मिला यांनी शिवसेनेच प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधत नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तशी त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. त्याआधीच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवलं होतं. दरम्यान, उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानुसार आज, उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.

अशी मांडणार आपली भूमिका

उर्मिला मातोंडकर आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील गोंधळ असल्याचे म्हणत त्या पक्षावर बोट ठेवत पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.


हेही वाचा – BMC च्या १७१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू; केवळ २५ कुटुंबांना आर्थिक मदत


First Published on: December 1, 2020 2:15 PM
Exit mobile version