गुलाबजामसाठी बनवलेल्या पाकाच्या कढईत पडून चिमुरड्याचा मृत्यू

गुलाबजामसाठी बनवलेल्या पाकाच्या कढईत पडून चिमुरड्याचा मृत्यू

गुलाबासाठी तयार केलेल्या पाकात पडून चिमुरड्याचा मृत्यू

औरंगाबादमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. गुलाबाच्या पाकात पडून दोन वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या दलालवाडी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. राजवीर नितीन मेघावाले असं या चिमुरड्याचे नाव आहे. या घटनेमुळे मेघावाले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पाकाच्या कढईत पडला

औरंगाबादच्या दलालवाडीमध्ये राहणाऱ्या नितीन मेघावाले यांच्या घरी गुरुवारी महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महापुजेसाठी मेघावाले यांच्या घरासमोर प्रसाद बनवण्याचे काम सुरु होते. प्रसादामध्ये गुलाबजामचा मेनू ठेवण्यात आला होता. घरातील सर्व जण महापुजेमध्ये व्यस्त होते. त्यावेळी नितीन यांचा मुलगा राजवीर खेळता खेळता प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी पोहचला. आचाऱ्यांनी गुलाबजामसाठी पाक तयार करुन ठेवला होता. राजवीर खेळता खेळता गुलाबजामला तयार केलेल्या गरम पाकाच्या कढईत पडला.

अखेर मृत्यूंशी झुंज संपली

राजवीरच्या रडण्याचा आवाज आल्याने पुजेसाठी बसलेले सर्व जण धावत आले. गंभीर जखमी झालेल्या राजवीरला ताबडतोब घाटी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र राजवीरची प्रकृती गंभीर होती. गेल्या चार दिवसापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजवीरचा अखेर आज मृत्यू झाला. याप्रकरणी औरंगाबादच्या क्रांती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

First Published on: November 26, 2018 3:11 PM
Exit mobile version