Breaking! कुर्ल्यातील बहुमजली इमारतीत अग्नितांडव, एका महिलेचा मृत्यू

Breaking! कुर्ल्यातील बहुमजली इमारतीत अग्नितांडव, एका महिलेचा मृत्यू

Fire in Kurla | मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच, आज कुर्ल्यामधील बहुमजली इमारतीला आग लागली आहे. या आगीत इमारतीचे सहा मजले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असून यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

कुर्ला पश्चिममधील एका बहुमजली इमारतीत आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. मात्र, ही आग एवढी भीषण होती की तिचे लोळ दहाव्या मजल्यापर्यंत पसरत गेले. अवघ्या काही मिनिटांतच इमारतीच्या सहा मजल्यांवर आगीच्या ज्वाळा पसरू लागल्या. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत एका महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.


मालाडमध्ये भीषण आग

मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथे डोंगराळ भागात सोमवारी सकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत व गॅस सिलिंडरच्या स्फोटात प्रेम तुकाराम बोरे (१२) या मुलाचा गंभीर जखमी झाल्याने दुर्दैवाने मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले असून त्यांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे. मालाड (पूर्व), कुरार व्हिलेज, जामऋषी नगर, वाघेश्वरी मंदीर येथे सोमवारी सकाळी १०.०० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत झोपड्यांमधील गॅस सिलिंडरचे एकामागोमाग एक असे तब्बल १५ स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे आग आणखीन भडकली. या आगीच्या घटनेमुळे झोपड्यांमधील रहिवाशांची एकच धावपळ झाली. दरम्यान, आगीची भीषणता पाहता या आगीत अनेक झोपडीधारकांचे संसार, सामान जाळून खाक झाले. त्यांची स्वप्ने बेचिराख झाली. सदर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगीच्या घटना सातत्याने घडत आहेत. कधी दाटीवाटीच्या परिसरात तर कधी बहुमजली इमारतींवर आग लागत असल्याने अग्नीशमन यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे राहत आहेत. कोणतीही हानी न होता आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाकडून सक्षम यंत्रणा उभारणीचे काम जोरात सुरू आहे.

First Published on: February 15, 2023 10:48 AM
Exit mobile version