अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा; काँग्रेसची टीका

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा; काँग्रेसची टीका

मुंबई : ‘अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा असून अर्थसंकल्पातून केवळ काल्पनिक परिणामांवर समाधान मानावे लागेल’ अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. (Budget beyond common man understanding Criticism of Congress)

‘आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला मात्र यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे’, असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला आहे. तसेच, ‘७ लाखांच्या उत्पन्नाला कर नाही हे स्वागतार्ह आहे परंतु देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ०.३ टक्क्यापेक्षा कमी लोकांना याचा फायदा होईल आणि बहुसंख्य लोकं फायद्यांच्या कक्षेबाहेर राहतील’, असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

‘अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी असंघटित क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसते असून, भाजपच्या मतांमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही’, अशीही टीका महेश तपासे यांनी केली.

‘चालू खात्यातील वित्तीय तूट नियंत्रित न आल्यास विपरीत परिणाम होऊन रुपया कमकुवत होण्याची शक्यता असते आणि नंतर उच्च आयात खर्च आकर्षित करण्यामुळे आपल्या परकीय गंगाजळीचा निचरा होण्याची शक्यता असते’, अशी भीती महेश तपासे यांनी व्यक्त केली.

त्याशिवाय, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते मात्र मोदीसरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने रोजगार निर्मितीत ते अपयशी ठरले आहेत. या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा बेरोजगार तरुणांचा प्रचंड भ्रमनिरास झाला आहे’, असा जोरदार हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला. ‘येत्या काही महिन्यांत जागतिक मंदीचा भारतावर परिणाम झाला तर ती भारतासाठी चिंतेची गंभीर बाब असणार आहे त्यामुळे सरकारला त्यादृष्टीने रणनीती पुन्हा आखावी लागेल’, असेही महेश तपासे यांनी सांगितले.


हेही वाचा – यंदाचा अर्थसंकल्प गरिबांना आधार आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा – एकनाथ शिंदे

First Published on: February 1, 2023 6:06 PM
Exit mobile version