बिल्डरचा निवासी सोसायटी अध्यक्षावर गोळीबार

बिल्डरचा निवासी सोसायटी अध्यक्षावर गोळीबार

प्रातिनिधिक फोटो

राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेली कणकवली रविवारी सकाळी गोळीबाराने हादरली. बांधकामाच्या वादातून एका विद्यमान नगरसेवकाच्या वडिलांनी आपल्या परवान्याच्या रिव्हॉल्वर मधून दोन राउंड फायर केल्याची तक्रार किशोर दाभोळकर यांनी पोलिसात दिली आहे. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण ?

कणकवली नजीक जानवली आदर्शनगर येथे बांधकाम व्यावसायिक सुभाष भोसले यांनी इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीच्या खुल्या जागेत भोसले यांनी स्वतःच्या बंगल्याचे वाढीव बांधकाम केल्यावरून सोसायटीचे अध्यक्ष दाभोळकर आणि सुभाष भोसले यांच्यात गेले काही वर्ष वाद सुरु असून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. दाभोळकर हे फेरफटका मारण्यासाठी मुंबई – गोवा महामार्गावर साकेडी फाटा येथे एकटेच गेले असता सुभाष भोसले यांनी त्यांना एकटे गाठून त्यांच्यावर रिव्हॉल्वरने फायरिंग केल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसून दाभोळकर यांनी भोसले यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भोसले यांच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचे दाभोळकर यांनी म्हटले आहे.

अदखपात्र गुन्हा दाखल

या घटनेनंतर पोलिसांनी भोसलेंच्या घराची झडती घेवून पंचनामा सुरू केला आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिली. बिल्डर आणि सोसायटीच्या अध्यक्षामधील वादातून झालेल्या गोळीबारामुळे कणकवली हादरून गेली आहे. पोलीस यंत्रणेने याचा योग्य तो तपास करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कणकवली वासियांतून होत आहे.

हेही वाचा – बारामतीचे बिल्डर दादा सांळुखेचा डोक्यात दगड घालून खून.

विरारच्या बिल्डरांनी जेष्ठ गायिकेलाही लुटले
First Published on: October 15, 2018 3:25 PM
Exit mobile version