धक्कादायक! संचारबंदी असूनही सांगोल्यात बैलगाडी शर्यत! शेकडो आले एकत्र!

धक्कादायक! संचारबंदी असूनही सांगोल्यात बैलगाडी शर्यत! शेकडो आले एकत्र!

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४२३च्या वर गेलेला असताना देखील अजूनही लोकांना याचं गांभीर्य आलेलं नसल्याची अनेक प्रकरणं शहरी भागामध्ये समोर आली आहेत. कुठे कुणी वाढदिवसाच्या पार्टीसाठी बाहेर पडतंय, तर कुणी धार्मिक कार्यक्रमासाठी हजारोंचा जमाव गोळा करतंय. पण आता राज्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील याच बेजबाबदारपणाची लागण झाल्याची दिसून येत आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यात याचा भयंकर प्रकार समोर आला असून लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी लागू असून देखील चक्क बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला इतर सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे या शर्यतीची माहिती मिळू शकली नाही. मात्र, जेव्हा त्याची माहिती मिळाली तेव्हा मात्र या स्पर्धेच्या आयोजकांसह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे दारात साक्षात मृत्यूचं संकट उभं असून देखील आपण त्याकडे किती गांभीर्याने पाहातोय, याचंच प्रत्यंतर येत असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला!

राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ४२३वर जाऊन ठेपला असताना एकट्या मुंबईत २३२ रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल पुणे, पिंपरी चिंचवड, सांगलीचं इस्लामपूर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बुलढाणा अशा राज्याच्या इतर भागांमध्ये देखील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाने जवळपास संपूर्ण राज्यामध्ये आपले हातपाय पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर कम्युनिटी स्प्रेडमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण तरीदेखील याचं गांभीर्य अद्याप लोकांना नसल्याचं दिसून येत आहे. सोलापुरात अद्याप कोरोनाचा फैलाव झाल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र, या बैलगाडी शर्यतीमुळे मोठ्या संख्येने लोक कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता एकत्र आले होते. त्यामुळे आता सोलापुरातही कोरोनाचा धोका वाढला आहे.

अजूनही लोकांना शहाणपण येईना!

याआधी देखील मुंबईच्या धारावी परिसरामध्ये संचारबंदी असूनदेखील बाहेर फिरणाऱ्या पोलिसांवरच स्थानिकांनी दगडफेक  केल्याचा प्रकार घडला आहे. तर, पिंपरी-चिचंचवडमध्ये वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी दोन तरुणी बाहेर फिरत असल्याचं निदर्शनास आलं होतं. नगरमध्ये तर आरोग्य सर्वेक्षण करायला गेलेल्या आरोग्य पथकालाच धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


हेही वाचा – बेफिकीरीचा विषाणू करोनाहून धोकादायक!
First Published on: April 3, 2020 8:01 AM
Exit mobile version