कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा अंशत: सुरू; बेळगावहून पुण्यासाठी बस रवाना

कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा अंशत: सुरू; बेळगावहून पुण्यासाठी बस रवाना

महाराष्ट्रातील वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड करण्यात आली होती. कन्नड रक्षण वेदीके संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला होता. तसेच, महाराष्ट्राच्या गाड्या कर्नाटकात जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा कर्नाटक-महाराष्ट्र बस सेवा सुरु झाली आहे. बेळगावहून कर्नाटक सरकारची बस पुण्याला रवाना झाली आहे. ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. (bus departs from belgaon to pune maharashtra karnataka border dispute bus service resumes from karnataka to maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावहून निघालेली ही बस खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही. कोल्हापूर बायपासमार्गे सातारा आणि पुण्याकडे रवाना होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. अखेर आज कर्नाटक सरकारची बेळगाव-पुणे ही बस रवाना झाली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने त्याला महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी प्रत्युत्तर दिले होते. तेव्हापासून दोन्ही राज्यातील वातावरण तापले. त्यानंतर कर्नाटकच्या बसला दौंड इथे शाई फासण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बसला कलबुर्गी इथे काळे फासण्यात आले. या साऱ्यांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद केली होती.

कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद केल्याने नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने कर्नाटक आणि महाराष्ट्रात दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. अखेर शुक्रवारी बस बेळगावहून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर कन्नड रक्षण वेदिके संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. तसेच, काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. महाराष्ट्राच्या ट्रकला शाईही फासण्यात आली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन निषेध व्यक्त केला होता.


हेही वाचा – दिल्ली, हिमाचलचे निकाल विरोधकांसाठी आशादायी, पण एकजूट होणार का?

First Published on: December 9, 2022 10:26 AM
Exit mobile version