बसप्रवास ठरतोय जीवघेणा! दोन महिन्यांत शेकडो जणांनी गमावला जीव

बसप्रवास ठरतोय जीवघेणा! दोन महिन्यांत शेकडो जणांनी गमावला जीव

सर्वसामान्यांसाठी बसप्रवास हा एक उत्तम आणि सोयीस्कर असा प्रवास आहे. अनेक प्रवासी खासगी बस किंवा एसटीने प्रवास करण्यात धन्यता मानतात. अगदी कमी पैशांत माणूस हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो. परंतु मागील काही महिन्यांपासून बसप्रवास हा प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतोय. अवघ्या दोन महिन्यांत शेकडो जणांनी या बसप्रवासातून आपला जीव गमावला आहे. नाशिकमधील कालची घटना पाहिली असता मन हेलावून टाकणारी घटना नाशकात घडली.

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात काल पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की त्यात १२ प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी हा अपघात झाला. त्यात बसचालकाचाही मृत्यू झाला.

यवतमाळ येथून ही बस काल रात्री नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यात ५३ पेक्षा अधिक प्रवाशी होते. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रक आणि बस यांच्यात भीषण अपघात झाला. यात ट्रकची डिझेल टाकून फुटून सर्वत्र डिझेल पसरले आणि दुसरीकडे बस अन्य एका चारचाकीला धडकली. त्यानंतर लगेचच बसमध्ये स्फोट होऊन आग लागली. अनेक प्रवाशी झोपेत असल्याने काही समजण्याच्या आतच भाजून त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना ताजी असतानाच त्याचदिवशी नाशकात पुन्हा एकदा बसने पेट घेतला. नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली. ही बस गडावर भाविकांना घेऊन जात होती. परंतु अचानक बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून आपला जीव वाचवला. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. तसेच अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली.

महाराष्ट्रात बसचं अग्नितांडव सुरू असतानाच देशात सुद्धा बस अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. आंध्रप्रदेशातील वनजंगी येथील परिसरात एक पर्यटक बसचा दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. ही बस विशाखापट्टणमहून पडेरूला जात होती. मात्र, बसचा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर जखमींना स्थानिकांनी बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.

६ ऑक्टोबर रोजी पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे दोन वेगवान बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या भीषण अपघातात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले होते. बस एर्नाकुलममधील मुलंथुरुथी येथील बसेलियस शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती, परंतु पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे केएसआरटीसीच्या बसला धडकली. पर्यटक बसचे नियंत्रण सुटले आणि कार ओव्हरटेक करताना केएसआरटीसी बसच्या मागील बाजूस आदळली. ताबा सुटल्यानंतर पर्यटक बस नजीकच्या दलदलीत जाऊन धडकली. वालार-वडक्कनचेरी राष्ट्रीय महामार्गावरील अंजुमूर्ती मंगलम बस स्टॉपजवळ हा अपघात झाला.

उत्तराखंडच्या पौरी गढवालमध्ये बसचा अपघात

उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी वऱ्हाड घेऊन जाणारी एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात २५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी या बसमध्ये सुमारे ४५ ते ५० प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. एसडीआरएफची चार पथकाकडून बचावकार्यात गुंतली. २१ जणांना वाचवण्यात यश आले.

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून अपघात

जम्मू काश्मीरमध्ये १४ सप्टेंबर रोजी बस दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला . तर २५ जण जखमी झाले. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात हा बस अपघात झाला. संबंधित बस सौजियान येथून मंडी येथे चालली असताना ही घटना घडली.

पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात

पुण्यात १९ सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाची शिवशाही बस आणि कंटेनरच्या भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात कंटेनर चालकांचा मृत्यू झाला आणि पाच ते सहा प्रवासी जखमी झाले होते.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांतही प्रवाशांचा खेळखंडोबा सुरू आहे. रस्ते अपघातांची मालिका ही आता राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू असून बससेवा प्रवास आता सर्वसामान्यांसाठी जीवघेणा ठरतोय असंच चित्र समोर दिसतंय.


हेही वाचा :हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळल्याने 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 10 जखमी


 

First Published on: October 9, 2022 4:10 PM
Exit mobile version