राज्यात अद्याप आकडेवारी कमी झाली असे म्हणता येणार नाही – एकनाथ शिंदे

राज्यात अद्याप आकडेवारी कमी झाली असे म्हणता येणार नाही – एकनाथ शिंदे

आज पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाने राज्यातील कोरोना परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली. संपूर्ण राज्यात अद्याप कोरोनाची आकडेवारी कमी झाली असे म्हणता येणार नाही. कोरोनाची परिस्थिती काही ठिकाणी आटोक्यात येत असली तरी अनेक ग्रामीण जिल्ह्यांमध्ये कोरोनाची आकडेवारी वाढल्याचे समोर आले असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाची सद्य परिस्थिती त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा तुटवडा,म्युकरमायकोसिसचा वाढता धोका लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन वाढवला जाणार का यावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. टास्क फोर्सच्या टिमशी चर्चा करुन मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अद्याप राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. (cannot be said that Number of corona Patients have decreased in Maharashtra yet – Eknath Shinde)

राज्याची आकडेवारी पाहता राज्यात काही ठिकाणी आकडेवारी कमी झाली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये आकडेवारी दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे टास्क फोर्सशी चर्चा करुन मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत सविस्तर निर्णय देतील. राज्यात वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस आजारावरही मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत तौक्ते चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानावरही चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाला ज्याप्रकारे मदत देण्यात आली त्याचप्रमाणे तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

First Published on: May 27, 2021 5:58 PM
Exit mobile version