उष्माघातामुळे वाहतूक पोलिसांची खबरदारी, ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना

उष्माघातामुळे वाहतूक पोलिसांची खबरदारी, ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी दिल्या महत्त्वाच्या सूचना

राज्यातील काही भागात उष्णतेचा पारा वाढत आहे. यामुळे मुंबईतील तापमानाचा पारा वाढलेला आहे. त्यामुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यावेळी उष्माघातामुळे वाहतूक पोलिसांची खबरदारी म्हणून ५५ वर्षांवरील पोलिसांसाठी मुंबई पोलीस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

५५ वर्षांहून जास्त वयामध्ये आरोग्याच्या समस्या असलेले मुंबईतील वाहतूक पोलीस हवालदार दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्त्यावरून ऑफ डुयटी राहणार आहेत. मुंबई वाहतूक विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत ठिकठिकाणी विकासकामं सुरू आहेत. यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीस भर उन्हात उभे राहून वाहतुकीचे नियमन करताना आढळतात. परंतु पोलिसांना उष्माघाताचा फटका बसू नये, यासाठी पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवतानाच काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील दुर्घटनेत १५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता, त्यामुळे भर उन्हात रस्त्यावर उभं राहून वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत खबरदारी घेण्यास दलाने सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे.

पोलीस अंमलदारांचे कर्तव्याबाबत काही मार्गदर्शक सूचना –

– वाहतूक विभागातील ज्या अंमलदारांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांना बीपी, शुगर, दमा, दुर्धर आजार, मोठे ऑपरेशन झाले आहे अशा अंमलदारांची दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत रस्त्यावरील कर्तव्याकरता नेमणूक करण्यात येऊ नये.

– कर्तव्याकरता तरुण आणि सशक्त अंमलदारांची नेमणूक करावी. कर्तव्य वाटप करताना जोडीने नेमणूक करावी. आवश्यक त्या ठिकाणी अंमलदारासोबत वॉर्डनची नेमणूक करावी.

– कर्तव्यावरील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकरिता स्वच्छ आणि शुद्ध पेयजल बॉटलची व्यवस्था त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजता करण्यात यावी.


हेही वाचा : अमित शाहांचा एकाच महिन्यात दुसरा महाराष्ट्र दौरा, मुख्यमंत्री स्वागताला जाणार


 

First Published on: April 26, 2023 10:18 AM
Exit mobile version