अनिल देशमुखांना CBI च्या टीमकडून ७५ प्रश्नांची सरबत्ती

अनिल देशमुखांना CBI च्या टीमकडून ७५ प्रश्नांची सरबत्ती

केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांची बुधवारी सलग आठ तासांहून अधिक वेळ मुंबईतील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे चौकशी झाली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांविरोधात ही चौकशी झाली. दिवसभर चाललेल्या चौकशीत परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बच्या मुद्द्यावर सीबीआयने अनिल देशमुख यांना एकुण ७५ प्रश्न या चौकशी दरम्यान विचारले असल्याची माहिती आहे. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यासोबतचे संबंध याबाबतची चौकशीही अनिल देशमुख यांच्या बाबतीत झाली. तर एसीपी संजय पाटील यांना पाठवलेल्या वॉट्स एप मॅसेजबाबतची चौकशीही सीबीआयच्या टीमकडून करण्यात आली.

१२ अधिकाऱ्यांची टीम 

मुंबई पोलिस दलात क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये असणारा अधिकारी हा राज्याच्या गृहमंत्र्यांच्या घरी येणे ही किती सामान्य बाब आहे ? असा सवाल सीबीआयच्या टीमकडून अनिल देशमुखांना करण्यात आला. तसेच सचिन वाझेला अनिल देशमुख यांनी घरी बोलावला होते का ? असाही सवाल सीबीआयच्या टीमकडून करण्यात आला. अनिल देशमुख यांना प्रश्न करणाऱ्या टीममध्ये दोन पोलिस अधिक्षक दर्जाचे सीहीआयच्या टीमचे अधिकारी होते. त्यामध्ये अभिषेक दुलर आणि किरण एस या अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे अनिल देशमुख यांची चौकशी केली. अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी सीबीआयने एकुण १२ जणांच्या टीमचा फौजफाटा निर्माण केला होता. महाराष्ट्रातील मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका मोठ्या नेत्याची आणि राज्याच्या माजी गृहमंत्र्यांची चौकशी करायची असल्याने सीबीआयकडूनही मोठी टीम या हाय प्रोफाईल प्रकरणात आता सक्रीयपणे काम करत आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राहिलेले परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमधील आरोपांचीही चौकशी अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआयच्या टीमने केली. या लेटर बॉम्बमधील आरोपांची विचारण अनिल देशमुख यांना सीबीआयच्या टीमकडून करण्यात आली. मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेल्या परमबीर सिंह यांच्या आरोपांमध्ये नेमके काय तथ्य आहे ? अशा प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती अनिल देशमुख यांना चौकशीदरम्यान करण्यात आली. सचिन वाझेला वसुली करण्यासाठीचे दिलेल्या आदेशाचीही चौकशी अनिल देशमुख यांना यावेळी करण्यात आली. तर एसीपी पाटील यांना पाठवण्यात आलेल्या वॉट्स एप मॅसेजेसचीही चौकशी यावेळी सीबीआयच्या टीमने केली.

८ तासाच्या चौकशीचा घटनाक्रम

सीबीआयच्या चौकशीसाठी अनिल देशमुख हे बुधवारी सकाळी १०.१५ च्या सुमारास दाखल झाले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या चौकशीली ११ वाजताच्या सुमारास सीबीआयच्या टीमने सुरूवात केली. ही चौकशी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू होती. पण संपुर्ण दिवसभराच्या चौकशीमध्ये सीबीआयच्या १२ जणांच्या टीमने अनिल देशमुख यांना एकुण ७५ प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या निमित्ताने त्यांच्या प्रत्येक उत्तराचा जबाब या टीमने नोंदवून घेतला आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्यासोबतचे अनिल देशमुख यांचे ट्युनिंग कसे होते ? तसेच हे दोघे कितीवेळा गृहमंत्र्यांच्या घरी यायचे ? मुंबई पोलिस दलातील आणखी इतर कोणते अधिकारी हे गृहमंत्र्यांच्या घरी यायचे अशी प्रश्नांची सरबत्ती अनिल देशमुख यांना सीबीआयच्या टीमकडून करण्यात आली. तसेच सचिन वाझेच्या निमित्ताने परमबीर सिंह यांनी केलेला १०० कोटी रूपयांच्या वसुलीच्या आरोपाबाबतची सीबीआयच्या टीमने संपुर्ण प्रकरणाची कसुन चौकशी केली. त्यावर अनिल देशमुख यांनी बहुतांश आरोप हे फेटाळले. तसेच आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे उत्तर दिल्याचे समजते. माझी आणि महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रयत्न झाला असल्याचे उत्तर अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या टीमला यावेळी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.


 

First Published on: April 15, 2021 8:41 PM
Exit mobile version