शरीर सुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला अटक

शरीर सुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला अटक

शरीर सुखाची मागणी करणारा बँक मॅनेजर निलंबित

पीक कर्जाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या दाताळ शाखेचा मॅनेजर राजेश हिवसे याला नागपूर येथे पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाणा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापूर्वी बँकेच्या शिपाई मनोज चव्हाण याला अमरावती पोलिसांनी २३ जून रोजी अटक केली होती. घटनेनंतर मॅनेजर राजेश आणि शिपाई मनोज चव्हाण या दोघांना बँकेतून निलंबित करण्यात आले होते. बँकेच्या दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले जाणार असल्याची माहिती बुलडाणा जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली आहे. त्याचबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षक शशिकुमार मीना यांनी सांगितले की, ‘या अगोदरही मॅनेजरने असे प्रकार केले आहेत का? याची चौकशी आम्ही करत आहोत. जनतेला आवाहन आहे की त्यांच्याकडे काही तक्रार असल्यास आम्हाला कळवावे.’

दोन दिवसात ६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दोन दिवसात बुलडाण्यातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. शेगाव तालुक्यातील कालखेड गावाच्या शिवराम तांबडे यांनी कर्जबारीपणाला वैतागून नाल्यात उडी मारुन आत्महत्या केली होती. तर मलकापूर तालुक्यातील दाताळ या एकाच गावाच्या अशोक धांडे आणि अमोल काशीराम झाडे या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. जामोद तालुक्याच्या अकोली गावातील नामदेव महादेव नेमाडे यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली होती. तर, जामोद तालुक्यातील लोणखेड गावाच्या विठ्ठल बर्वे यांनी आत्महत्या केली होती. त्याचबरोबर पीककर्जाला वैतागून खामगाव तालुक्यातील हिवरा गावच्या भगवत कनिराम बघे यांनी आत्महत्या केली होती.

बँकेतले अधिकारी लुटारु – शंकर आण्णा धोंडगे

दरम्यान, किसान सभेचे अध्यक्ष व माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे यांनी दाताळच्या किळसवाणी प्रकाराविषयी माय महानगरला प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, ही घटना अत्यंत घृणास्पद असून सगळ्यांची मान शरमेने खाली गेली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांची एक लुटारु टोळी आहे. ही टोळी आजपर्यंत शेतकऱ्यांचे शोषण करत आली आहे. बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना वेठबिगार असल्यासारखी वागणूक देतात. उद्योगपतींना कोट्यावधी रुपये दिले जातात. पण, शेतकऱ्यांच्या बाबतीत हे अधिकारी नाक मुरडतात. शेतकऱ्यांना पन्नास हजाराच्या कर्जासाठी शेकडो कागदपत्रे मागतात. दाताळीमध्ये पीक कर्ज नाही मिळाले म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्येला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर जबाबदार आहे. त्यामुळे त्याला फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. त्याचबरोबर सरकार बँकेच्या प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिले जात नाही. या उदासीनतेला कारण सरकारच आहे. बँकानी शेतकऱ्यांचा अशाप्रकारे छळ केला तर शेतकरी पुन्हा सावकारच्या दारापुढे कर्जासाठी उभा राहील, असा हा सगळा नियोजित कारभार असल्याची टीका धोंडगे यांनी केली.

First Published on: June 24, 2018 3:10 PM
Exit mobile version