नाशिक रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’

नाशिक रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’

प्रातिनिधिक छायाचित्र

मध्य रेल्वे महसूल वाढविण्यासाठी काही ना काही नवीन नवीन कल्पना राबवत असते. आता तर चक्क रेल्वे स्थानकात ऑक्सिजन देणारे रोपटे विकण्याची योजना मध्य रेल्वेने सुरु केली आहे. यासाठी एका कंपणीला कंत्राट सुद्धा देण्यात आले आहे. नासाकडून मान्यता प्राप्त झालेल्या १८ प्रकारचे रोपांची विक्री करण्यात येणार आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक ७५ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘झाडे वाढवा, पर्यावरण वाचावा’ ही मोहीम देशभरात सुरु आहे. मध्य रेल्वेकडून सुद्धा पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वपूर्ण योजना आखली आहे. हवा शुद्धीसाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका) सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यांची सुरुवात मध्य रेल्वेच्या नाशिक रोड स्थानकातून सुरु होणार आहे. या रोप वाटिकेत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा – NASA) कडून मान्यता प्राप्त १८ प्रकारचे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे रोपटे विक्रीस ठेवले जाणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर हवा शुद्धीसोबतच पर्यावरण स्नेही वातावरण प्रवाशांना मिळेल. इतकेच नव्हे तर या रोप वाटिकेतून प्रवाशांना रोपटे विकत सुद्धा घेता येणार आहे. रोपट्यांची किंमत २०० ते ५०० रुपयांपर्यत असू शकते, अशी माहिती मिळत आहे.

भारतीय रेल्वेचे उत्पादन वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम म्हणजेच एनआयएनएफआरआयएस मार्फत अनेक योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजन पार्लरच्या माध्यमातून रेल्वेला वर्षाला ७५ हजार रुपयांचा महसूल मिळेल, असे रेल्वेतर्फे सागंण्यात आले आहे.

लवकरच योजना मुंबईतही राबविणार

परराष्ट्राच्या धर्तीवर मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकात हवा शुद्धीसाठी आणि पर्यावरण स्नेही वातावरणासाठी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका) सुरु करण्यात येणार आहे. ऑक्सिजन पार्लर असलेले नाशिक रोड रेल्वे स्थानकात हे भारतीय रेल्वेतील पहिले स्थानकात असणार आहे. यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुद्धा ऑक्सिजन पार्लर सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वे जागेची पाहणी करत आहे. लवकरच सीएसएमटी रेल्वे स्थानकात सुद्धा प्रवासी ऑक्सिजन पार्लरमधून रोपटे विकत घेऊ शकता येणार आहे.

पर्यावरणच्या रक्षणासाठी मध्य रेल्वे नेहमीच प्रयत्न करत असते. रेल्वे स्थानकात पर्यावरण स्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही नाशिक रोड रेल्वे स्थानकात ऑक्सिजन पार्लर (रोप वाटिका) सुरु करत आहोत. या पार्लरमध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारे रोपटे असणार आहे. ते प्रवाशांना सुद्धा रास्त दरात विकत घेता येणार आहे. शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी – मध्य रेल्वे
First Published on: December 17, 2019 3:47 PM
Exit mobile version