पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत; मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. पावसामुळे रेल्वेच्या रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तिन्ही मार्गावरील रेल्वे जवळपास २० ते २५ मिनिटे उशिराने होत आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (central western and harbor railway line affected due to heavy rainfall)

स्थानकांत प्रवाशांची गर्दी

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. कामवरून सुटण्याची वेळ आणि लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने स्थानकांत प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीची इशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसाच्या जोरदार बॅटींगमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी सध्या इशारा पातळीवर वाहत आहे.

सध्या मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, पालघरच्या काही भागात येत्या ३ ते ४ तासांत पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये काही भागात जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यात मध्यम ते जोरदार सरी अनेक ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे तरी मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर नाही.


हेही वाचा – पुढील निवडणुकीत २०० आमदार निवडून आणणार, एकनाथ शिंदेंचा निर्धार

First Published on: July 4, 2022 7:34 PM
Exit mobile version