मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्राने घ्यावा!

मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्राने घ्यावा!

आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आल्याने हे एक प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झाले.आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीच घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही; पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरूच राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करणारा निर्णय दिला. या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र कोरोनाविरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि लढवय्या समाजाचे दुर्दैवच म्हणायला हवे, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठीच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या विधिमंडळात सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने घेतलेल्या या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयाने वरवंटा फिरवला. काय तर म्हणे महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासहीत सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली. महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे आणि सरकार हे लोकांचा आवाज आहे. मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील मोठ्या पीडित वर्गाचा आक्रोश असल्यामुळेच सरकारने निर्णय घेतला होता, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत. त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित करत असल्याचे ठाकरे म्हणाले.

 शहाबानो, ट्रोसिटीप्रमाणे गती दाखवावी
शहाबानो प्रकरण, ट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच ३७० कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेवून न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी.

First Published on: May 6, 2021 4:10 AM
Exit mobile version