आजपासून सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव; ट्रस्टतर्फे तयारी पूर्ण

आजपासून सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव; ट्रस्टतर्फे तयारी पूर्ण

राज जोशी । सप्तशृंग गड : साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरती श्री सप्तशृंगी देवीच्या गुरुवार, दि.३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधींसाठी तयारी झाली असून, ग्रामपंचायतसुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे.

गुरुवारी (दि. ३०) रामनवमीनिमित्त सकाळी 6.30 वाजता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त, तहसीलदार, सरपंच, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ट्रस्टच्या मुख्य कार्यालय ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश हे सकाळी सात वाजता देवीची पंचामृत महापूजा व महापूजा संपन्न झाल्यावर आरती करणार येणार आहे. दुपारी १२ वाजता देवी मंदिरात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. चैत्रोत्सवादरम्यान मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार असून, यादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पंचामृत महापूजा, दुपार महानैवेद्य आरती व सायंकाळी सांज आरती या तीनही वेळेत भगवतीची आरती होणार आहे. ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता भगवतीच्या शिखरावरील ध्वज फडकणार असून ध्वजाची विधिवत पूजा दुपारी साडेतीन वाजता पारंपरिक देवीभक्त गवळी पाटील यांच्या उपस्थितीत श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात विधिवत पूजा संपन्न होणार आहे. त्यानंतर संपूर्ण गावात ध्वज मिरवणूक होऊन रात्री बाराच्या सुमारास श्री भगवतीच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यादरम्यान सकाळ संध्याकाळ ट्रस्टच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्षभरात दोन वेळा यात्रा भरणार्‍या सप्तशृंग गडावर श्री सप्तशृंग देवीच्या उत्सवास महत्त्व आहे. या दरम्यान खान्देशातील लाखो भाविक सप्तशृंग गडावर श्री भगवती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी हजेरी लावतात असा हा उत्सव ३० मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत साजरा होणार आहे. यात्रेदरम्यान तयारीसाठी तहसीलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात नियोजन बैठक घेण्यात येऊन यात्रेसंबंधित महत्त्वाच्या विभागांना यात्रा तयारीसाठी सूचना देऊन प्रत्येकी विभागीय जबाबदारी देण्यात आल्या आहेत. मंगळवारी (दि.२८) सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सप्तशृंग गडावर आढावा बैठक घेऊन विभागवार तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा – ग्रामपंचायत व प्रशासनाने गडावरील हॉटेल व्यावसायिकांना शुद्ध पाणी वापरण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यामध्ये हॉटेलमध्ये अशुद्ध पाणी आढळून आल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला. आदिमाया सप्तशृंगी देवीचे माहेरघर असलेल्या खान्देशातील भाविक पायी प्रवास करून आई सप्तशृंगीच्या दर्शनासाठी व श्री भगवतीच्या चरणी लीन होण्याकरिता शेकडो मैल पायी येतात. यावेळी अनेक दशकांपासून देवीच्या मूर्तीवर शेंदूर लेपण होत होते. आता देवीच्या मूर्तीवरील काहिक किलो शेंदूर कवच काढल्यानंतर आदिमायेचे मूळ मनोहर रूप बघण्यासाठी खान्देशातून यंदा लाखो भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

 

First Published on: March 30, 2023 6:07 PM
Exit mobile version