‘दानवेंनी जे केलंय ते मनाला लागलं’; सेनेच्या खैरेंची खदखद

‘दानवेंनी जे केलंय ते मनाला लागलं’; सेनेच्या खैरेंची खदखद

चंद्रकांत खैरे रावसाहेब दानवेंवर नाराज

शिवसेनेचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात मनातील खदखद व्यक्त केली आहे. याशिवाय देव आपल्या पाठीशी असून आपलाच विजय होईल, असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे. ‘टिव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही खदखद व्यक्त केली आहे. यासोबतच रावसाहेब दानवे यांनी जे केले आहे ते मनाला लागले आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे औरंगाबाद मतदारसंघातून उमेदवारी लढवत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते यावर्षी त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, रावसाहेब दानवे प्रचाराच्या काळात औरंगाबादमध्ये आले होते. औरंगाबाद येथील एका रुग्णालयात ते उपचाराच्या निमित्ताने थांबले होते. परंतु, दानवे यांनी उपचाराच्या बहाण्याने जावई हर्षवर्धन जाधव यांना प्रचारात मदत केल्याचा आरोप खैरे यांनी केला. या कामात औरंगाबाद येथील भाजपच्या सात-आठ नगरेवकांनी खुल्याने मदत केल्याचा आरोपही खैरे यांनी केला आहे.

‘देव माझ्या पाठिशी आहे’

चंद्रकांत खैरे म्हणाले की, ‘परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मीच विजयी होणार. भद्रा मारुती, दक्षिणमुखी मारुती, राजूरचा गणपती आणि शनिशिंगणापूरचा शनी माझ्या पाठीशी आहे. दक्षिणमुखी मारुतीसमोर असलेला यज्ञ अजूनही सुरु आहे. मोठ्या उत्साहात मी यज्ञाची सांगता करणार आहे.’

खैरेंच्या आरोपानंतर भाजपने जारी केले पत्रक

चंद्रकांत खैरेंच्या आरोपानंतर भाजपकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात भाजपचे सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी काम केले. प्रदेशाध्यक्ष दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी स्वत: मतदारसंघात तीन दिवस मुक्काम केला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह प्रचार केला.

First Published on: May 21, 2019 2:34 PM
Exit mobile version