कोल्हापूर-सांगली पुराला काँग्रेस राजवट जबाबदार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर-सांगली पुराला काँग्रेस राजवट जबाबदार – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांची सीआयडी चौकशीची मागणी

‘कोल्हापूरची पूररेषा निश्चित करण्याचे काम काँग्रेसच्या राजवटीत २००५ मध्ये झाले. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचेही काम त्यांच्याच राजवटीत २०११-१२ मध्ये झाले. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आलेल्या पुराला कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाजप सरकार जबाबदार नाही, तर त्यावेळी सगळीकडे असलेली काँग्रेसची राजवटच जबाबदार आहे’, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पाणी वळवण्यासाठी १० हजार कोटींचा प्रकल्प

सध्या पंचगंगा नदीची पूररेषा भाजपने बदलल्याचा आरोप केला जात आहे, त्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले, ‘पूररेषा बदलण्यासाठी आम्हाला आलेल्या प्रस्तावानुसार किमान १ हजार हेक्टर जमिनीचा विकास करता येऊ शकतो. नदीच्या पूररेषेचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच ही घटना घडली. भाजपने बिल्डरांच्या हितासाठी पूर रेषा बदलेली नाही. हा आरोप खोटा आहे. कोणत्याही धरणात ७० टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर धरणातून पाणी सोडावे असा कायदा करण्याचा विचार आहे. परत पाऊस पडेल की नाही या विचाराने अभियंते ९५ टक्के धरण भरल्यावर पाणी सोडतात. यावेळीही असेच झाले. पण असा कायदा केल्यास पुराचा धोका कमी करता येईल. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता. पण तो किती पडणार हे कळत नाही. कोल्हापूरला जो पाऊस आला त्यावेळी चार महिन्याचा पाऊस चार दिवसांत पडला. कोणाच्याही हातात ही स्थिती नव्हती. भविष्यात पुन्हा असे होऊ नये यासाठीच नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी १० हजार कोटींचा प्रकल्प केला जाणार आहे’, असे पाटील यांनी सांगितले.

धरणांचे नियोजन चुकल्यामुळेच पूर

‘पूररेषेतील बांधकामांमुळे पूर आलेला नाही. कोल्हापूरच्या पंचगंगा आणि इतर नद्यांची पूररेषा अद्याप निश्चित झालेली नाही. अस्तित्वात असलेली पूररेषा जुनीच आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी पूररेषा बदलली, हा आरोप चुकीचा आहे. पूररेषेमध्ये झालेल्या बांधकामांमुळे नाही तर धरणांचे नियोजन चुकल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली’, असे स्पष्टीकरण यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

First Published on: August 23, 2019 10:33 PM
Exit mobile version