मविआ सरकार झुकती है, बस..; चंद्रकांत पाटलांचे फिल्मी स्टाईलने ट्विट

मविआ सरकार झुकती है, बस..; चंद्रकांत पाटलांचे फिल्मी स्टाईलने ट्विट

राज्यात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरून लक्ष केले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, महाविकासआघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए, अशा प्रकारचं ट्विट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मविआ सरकारला पाटलांचा टोला

मविआ सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए!. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे, असं ट्विट करत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला फिल्मी स्टाईलने टोला लगावला आहे.

आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा, असा टोला भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन राऊत यांना लगावला आहे.

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. यावर देखील चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जब होगी किताब तब नही चलेगा हिजाब! मागील काही दिवसांपासून देशात हिजाब या विषयाला हाताशी धरत समाजकंटकांकडून धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.आज याच विषयात निर्णय देताना कर्नाटक हायकोर्टाने हिजाब हा इस्लामचा मुख्य पेहराव नसल्याचे म्हणत सर्व याचिका फेटाळल्या आहेत, असं ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मुस्लिम समाजातील तरुणांची माथी भडकवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या त्या समाजातील पुढाऱ्यांना आणि अनेक राजकीय पक्षांना ही मोठी चपराक आहे. महाराष्ट्रातही मविआ सरकारच्या मदतीने काही संघटना हे प्रकरण तापवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे निंदनीय आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा : औरंगाबादच्या नामांतरावरून आघाडी सरकारमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न – भास्कर जाधव


 

First Published on: March 15, 2022 7:32 PM
Exit mobile version