घरताज्या घडामोडीऔरंगाबादच्या नामांतरावरून आघाडी सरकारमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न - भास्कर जाधव

औरंगाबादच्या नामांतरावरून आघाडी सरकारमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न – भास्कर जाधव

Subscribe

राज्य सरकार औरंगाबाद शहराचे नाव बदलून ते संभाजीनगर असे करणारच आहे. नव्हे तर आज ना उद्या महाराष्ट्र सरकारला तसा निर्णय घ्यावाच लागेल, असा घरचा आहेर देत शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत औरंगाबादच्या नामांतराच्या मागणीचे समर्थन केले. त्याचवेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून भाजपवरही टीकास्त्र सोडले. राज्यात पाच वर्ष तुमचा मुख्यमंत्री आणि केंद्रात सरकार असताना तुमचे संभाजी महाराजांबद्दलचे प्रेम कुठे गेले होते? असा सवाल त्यांनी केला.

औरंगाबादच्या नामांतरावरून आघाडी सरकारमध्ये दरी निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. दोन्ही कॉंग्रेसने सत्तेचा अनुभव घेतला आहे. तर आम्ही तुमचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आघाडीचे मिश्रण मजबूत झाले आहे, असा टोला जाधव यांनी भाजपला उद्देशून लगावला.

- Advertisement -

सन २०२२ -२३ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सहभागी होताना भास्कर जाधव यांनी आज आपल्या तडाखेबंद भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले. कोरोना रुग्णसंख्या, कोविड रुग्णालय, वाईन विक्री, नैसर्गिक आपत्ती आदी मुद्द्यांवरून जाधव यांनी विरोधी पक्षाला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला.

ज्या संस्थाना अनुभव नव्हता अशा संस्थाना कोरोना केंद्राचे कंत्राट देण्यात आले या आरोपाचा समाचार घेताना जाधव यांनी मग अंबानीच्या कंपनीला राफेलचे कंत्राट देताना संरक्षण सामुग्री उत्पादन करण्याचा कोणता अनुभव होता? अस सवाल जाधव यांनी केला. महाराष्ट्र सरकारने कोरोना मृतांचे आकडे लपवले नाहीत. मात्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याने कोरोना मृत्यू लपवले. उत्तर प्रदेशात गंगेत हजारो मृतदेह वाहून आल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. राज्यातील जनतेसाठी एकाचवेळी कोरोना प्रतिबंधित लस घेण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने ठेवली असताना केंद्र सरकारने लस खरेदी करायला परवानगी दिली नाही, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

तुम्ही वाईनच्या निर्णयावरून सरकारवर टीका करता. राज्य सरकारने मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. पण मध्य प्रदेश सरकारने घरात दारूचा बार उघडण्यास मान्यता दिली आहे, असे जाधव यांनी विरोधी पक्षाच्या निदर्शनास आणून दिले. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विरोधावरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना जाधव यांनी आधारकार्ड, रोजगार हमी योजना, वस्तू आणि सेवा कर, परदेशी गुंतवणूक यांना कुणी विरोध केला होता? असा प्रश्न केला, कोकणात निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ आल्यानंतर आपद्ग्रस्तांना मदत म्हणून तुम्ही केंद्रातून एक रुपया तरी आणला का? असा सवालही भास्कर जाधव यांनी भाजपला केला.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचे सरकार आणा, वीज तोडणीच्या संकटातून मुक्त व्हा ; बावनकुळेंचं शेतकऱ्यांना आवाहन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -