सोमय्यांना स्थानबद्ध करण्यास ते गुन्हेगार आहेत का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

सोमय्यांना स्थानबद्ध करण्यास ते गुन्हेगार आहेत का? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी मुंबईतील घरी स्थानबद्ध केलं आहे. सोमय्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात केलेल्या आरोपांचा पाठपुरावा करण्यासाठी कोल्हापूरला जाणार होते. परंतु कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कोल्हापूरात येण्यास मनाई केले आहे. सोमय्यांच्या घराखाली करण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. किरीट सोमय्या गुन्हेगार आहेत का? महाराष्ट्रात आता आणीबाणी लावण्याची बाकी आहे. ती सुद्धा लावून टाका असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या घोटाळे बाहेर काढणार असल्याचे राज्य सरकारला समजले असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरला जाण्यास रोखण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला. महाविकास आघाडी सरकारने त्यांना रोखण्यासाठी पोलीस पथक पाठवले, त्यांच्यावर दबाव आणला. कोल्हापूरमध्ये प्रवेश करू देणार नाही, रेल्वे स्थानकावरून परत पाठवू, कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये स्थानबद्ध करू असे इशारे किरीट सोमय्या यांना या सरकारने दिले.

राज्यातील लोकशाही संपली का असा सवाल करून मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालणार नाही. या सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही आणि किरीट सोमय्या हे सुद्धा घाबरत नाहीत. भाजपा किरीट सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांनी उघडकीस आणलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे तार्किक शेवटाकडे नेली जातील. महाविकास आघाडीने दडपल्याने हे विषय थांबणार नाहीत.

मुंबईत घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांकडून पकडले जाते. महाविकास आघाडीच्या राज्यात दहशतवादी मोकळेपणाने फिरतात आणि किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर मात्र दीडशे पोलिसांचा वेढा घातला जातो, याचा आपण निषेध करतो.

मुश्रीफांना अटक का नाही?

मुश्रीफ यांच्यावर इन्कम टॅक्सची छापेमारी झाली. या कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना पळून यावे लागले. ५०० लोकं येऊन बसली आणि कारवाई होऊ देणार नाही अशा घोषणा दिल्या गेल्या यामुळे अधिकारी परत पुण्याला आले. परंतु किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.जर त्यांना जाऊ दिलं नाही तर त्यांना कोर्टात जाण्याचा आदेश दिला आहे. त्यांना कोर्टात जाऊ दिले नाही तर भाजप कोर्टात जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यंत्रणेच्या कारवाईदरम्यान अडथळा आणला यामुळे हसन मुश्रीफ यांना अटक का नाही झाली असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

सोमय्यांच्या कारवाईचा निषेध

किरीट सोमय्या यांच्याविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. सोमय्या यांना स्थानबद्ध करणं चुकीचे आहे. काहीही झाले तरी आम्ही राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा :  मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, सोमय्यांचा गंभीर आरोप


 

First Published on: September 19, 2021 6:00 PM
Exit mobile version