शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे भाजपचा पराभव – चंद्रकांत पाटील

शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे भाजपचा पराभव – चंद्रकांत पाटील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

‘शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूरमध्ये भाजपचा पराभव झाला’, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्याने शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आधीच मुख्यमंत्री कोण यावरून शिवसेना-भाजपा यामध्ये वाद सुरू असताना आता कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या खासदारावर चंद्रकांत पाटील यांनी आरोप केला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संजय मंडलिक यांनी बंटी पाटील यांच्यासाठी उघड उघड काम केल्याचेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत. एवढेच नाही तर ‘मंडलिक यांच्या प्रवृत्तीचा शिवसेनेने विचार करावा’, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच बंडखोरी आम्हा दोन्ही पक्षांना क्षमवता आली नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ज्यांनी बंडखोरी केली त्यांची हाकलपट्टी तर आम्ही करणारच आहोत पण मूळ शिवसैनिकांनी येऊन सोयीचे राजकारण करणाऱ्या संजय मंडलिक यांना बाजूला ठेवावे, असे देखील चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

आमचं काय चुकलं  

दरम्यान, ‘पश्चिम महाराष्ट्रात सपाटून मार खाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या जनतेला आमचे काय चुकलं’, असा सवाल करत ‘ज्यांनी टोल आणला त्यांना मतदान आणि ज्यांनी टोल घालवला’, त्यांना मतदान नाही. तसेच ‘ज्यांनी कोल्हापूर सुंदर केले त्यांना मतदान नाही’ आणि ‘ज्यांनी भकास केले त्यांना मतदान’, असे एक ना अनेक सवाल चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला विचारले आहे.  एवढंच नाही तर आम्हाला समजून घ्यायचे आहे की, सांगली कोल्हापूरमध्ये आमचे काय काय चुकले. जर हे लोकांकडून कळलं तर आम्हाला चुका सुधारता येईल असे देखील पाटील यावेळी म्हणाले आहेत.

दोघांचा सन्मान ठेवून सराकर स्थापन करणार 

विशेष बाब म्हणजे सरकार स्थापन करताना कोणता निकष लावला जाणार, असे चंद्रकांत पाटील यांनी विचारले असता त्यांनी दोघांचाही सन्मान ठेवून सरकार स्थापन केले जाईले, असे सांगत संजय राऊत यांचे मत वैयक्तिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच भाजपच्या जागा कमी झाल्या तरी भाजपचा स्ट्राईर रेट वाढल्याचे त्यांनी सांगत भाजपने २०१४ मध्ये २६० जागा लढवल्या होत्या. तेव्हा १२२ जागा जिंकल्या आणि आता भाजपने कमी जागा लढूनही १०५ जागा जिंकल्या, असे सांगत भाजपला सर्वाधिक मते पडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका करत आता इव्हिएमवर बोलणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, साताऱ्यामध्ये उदयनराजे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला असून, याच्या आधी जशी इतर लोकांची काळजी घेतली तशी काळजी उदयनराजेंची घेतली जाईल. त्यांना नीट सन्मान दिला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – ‘बाप बापच असतो’,कोल्हापूर भाजपमुक्त झाल्यानंतर राष्ट्रवादीची बॅनरबाजी


 

First Published on: October 27, 2019 4:26 PM
Exit mobile version