जोशी बुवानंतर पाटील बुवा भविष्य कधीपासून पाहायला लागले, छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला

जोशी बुवानंतर पाटील बुवा भविष्य कधीपासून पाहायला लागले, छगन भुजबळांचा चंद्रकांत पाटलांना टोला

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला मोठं यश मिळेल असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जोशी बुवा आधी भविष्य सांगायचे आता पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. भाजप आणि महाविकास आघाडी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भुजबळांच्या फार्म हाऊसची पाहणी केली यानंतर सोमय्यांविरोधात नोटीस बजावण्यात आली याबाबतही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील येवला येथे विकास कामांचा पाहणी दौरा करत होते. भुजबळांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. भाजपला देशातील पाच राज्यांतील निवडणुकीमध्ये चांगले यश मिळणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं असल्याचे भुजबळाना सांगितले. यावर भुजबळ म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी भविष्यवाणी सांगयला सुरुवात केली आहे. मी त्यांना विचारले जोशी बुवा भविष्य पाहायचे, पाटीलबुवा कधीपासून भविष्य सांगायला लागले? असा टोला चंद्रकांत पाटलांना भुजबळांनी लगावला आहे.

दरम्यान मी भाजीवाला आहे. भविष्यकार आहे का? परंतु केंद्रीय यंत्रणांचा वापर करणाऱ्या भाजपला थांबवण्यासाठी लोकशाही मानणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.

सोमय्यांची तब्येत बिघडू नये म्हणून पोलिसांकडून नोटीस

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सोमय्या यांनी भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसची पाहणी केली आहे. सोमय्यांनी मालमत्तेची पाहणी केल्यामुळे त्यांच्याविरोधात नोटीस बजावण्यात आली आहे. यावर भुजबळ म्हणाले की, सांताक्रूझ येथील बंगल्याची सोमय्यांनी लोकांची गर्दी करुन पाहणी केली. त्यांची तब्येत बिघडू नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.


हेही वाचा : 19 बंगल्यांच्या गूढ रहस्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता करावी, किरीट सोमय्यांचं आव्हान

First Published on: February 18, 2022 5:43 PM
Exit mobile version