शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला

शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यासाठी मागील काही वर्षांचा राजकीय प्रवास मोठा अडचणीचा राहिला. अनेक दिवस तुरुंगात राहण्याचीही नामुष्की छगन भुजबळ यांच्यावर आली होती. मात्र, सध्या ते पुन्हा एकदा राजकारणात जोमाने सक्रीय झाले. राजकारणातील या पुनरागमनाचे श्रेय छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे. शरद पवार यांनी माझा महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश करून मला राजकीय पुनर्जन्म दिला आहे, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ते महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समता परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते .

महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मला स्थान देऊन शरद पवारांनी मला राजकीय पूर्णजन्म दिलाय. माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्यांचे मी आभार मानतो. आज बाळासाहेबांचा पुत्र राज्याची धुरा हाती घेत आहे याचा आनंद आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमानुसारच चालेल. त्यासाठीच सर्वांनी चर्चा करुन हा किमान समान कार्यक्रम ठरवला आहे आणि त्यावर स्वाक्षर्‍या देखील केल्या आहेत,असेही भुजबळ म्हणाले.

मी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझी राजकीय आणि सामाजिक कामाची सुरुवात केली. त्यानंतर काही कारणाने मी काँग्रेसमध्ये गेलो. जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा मी देखील त्यांच्यासोबत बाहेर पडलो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. आज मला आनंद आहे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत,असेही भुजबळ म्हणाले.

First Published on: November 29, 2019 1:42 AM
Exit mobile version