छत्रपती संभाजीनगरात दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगरात दोन गटातील वादानंतर दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ, परिस्थिती नियंत्रणात

किराडपुरा राममंदिर येथे झालेल्या जाळपोळीनंतर गुरुवारी सकाळचे दृष्य

Chhatrapati Sambhaji Nagar Riots : छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात (Kiradpura) दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली आहे. यात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून आठ ते दहा गाड्या जाळण्यात आल्या आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन शांततेचे आवाहन केले आहे. ही घटना रात्री ११.३० ते १२ वाजता दरम्यान घडली. आणि त्यानंतर हिंसाचार उसळला. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता (Dr.Nikhil Gupta)
यांनी सांगितले आहे.

परिस्थिती नियंत्रणात – पोलिस उपायुक्त नांदेडकर
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला असून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितलं आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून यानंतर रात्री किराडपुरा, राममंदिर, रोशनगेट, बुढीलेन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काय आहे प्रकरण
शहरातील किराडपुरा भागात राममंदिरात (Kiradpura Rammandir) रामनवमीची तयारी सुरु होती. तयारीसाठी जमा झालेल्या तरुणांच्या एका गटाचा दुसऱ्यागटासोबत वाद झाला. काही वेळातच या वादाचे रुपांतर दगडफेक आणि जाळपोळीत झाले. मंदिर परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे हिंसाचार वाढला. पोलिसांची अधिक कुमक बोलावण्यात आली. तोपर्यंत जमावाने पोलिसांची वाहनांवर दगडफेक आणि जाळपोळ केली होती. रात्री ११.३० वाजता सुरु झालेला हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच खासदार घटनास्थळी
दगडफेक आणि जाळपोळीची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil)  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. पूर्वचे आमदार आणि मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी देखील किराडपुरा भागात धाव घेतली आणि शांततेचे आवाहन केले आहे.

शहराची शांतता कोणीही भंग करु नये – खासदार इम्तियाज जलील
इम्तियाज जलील यांनी जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, मी सर्वांनाच हात जोडून विनंती करु इच्छितो की सर्वांनीच शांतता प्रस्थापित केली पाहिजे. आज रामनवमीचा दिवस आहे, सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करावा. रमजानचा महिना आहे, हा इबादतचा महिना आहे. सर्वांनी शांततेत उत्सव साजरे करावे. पोलिसांना आवाहन आहे की, जेही दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. हे शहर आपले सर्वांचे आहे. त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये, असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी दिली होती दंगलीची सूचना
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी शहरात दंगल घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची सूचना संबंधीत यंत्रणांना दिली होती. यासंबंधी त्यांनी माध्यमांनाही माहिती दिली होती. शहरात दंगल घडवून आणण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा : हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

First Published on: March 30, 2023 7:49 AM
Exit mobile version