छोटा राजनला ८ वर्षांची शिक्षा

छोटा राजनला ८ वर्षांची शिक्षा

छोटा राजन

कुख्यात गुंड छोटा राजनसह सहा आरोपींना मुंबईतील सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने दोषी ठरविले आहे. ऑक्टोबर २०१२ साली अंधेरीत हॉटेल मालक बी.आर.शेट्टी यांच्या गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि इतर पाच जणांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. छोटा राजनसह या सहाजणांना आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच सहाही जणांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. छोटा राजनविरोधात सध्या सुरू असलेल्या खटल्यांसाठी स्थापन केलेल्या विशेष मोक्का कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

२०१२ साली बी. आर. शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाच्या शूटआऊट प्रकरणात छोटा राजनला शस्त्रे कायद्यानुसार दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणी १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात छोटा राजनच्या सांगण्यानुसार शेट्टी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, असे नमूद करण्यात आले आहे. त्याआधी २०१८ साली ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याप्रकरणी देखील छोटा राजनला दोषी ठरविण्यात आले होते.

हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर २०१२ मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

First Published on: August 21, 2019 6:05 AM
Exit mobile version