‘चिकनमुळे करोना होतो’ ही अफवा थांबविण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल

‘चिकनमुळे करोना होतो’ ही अफवा थांबविण्यासाठी सरकारची अनोखी शक्कल

प्रातिनिधिक छायाचित्र

करोना व्हायरसच्या भीतीने सध्या भारताची चिंता वाढवली आहे. देशभरातील करोना संशयित रुग्णाचा आकडा आता ४५ वर आला आहे. तर महाराष्ट्रात एकही करोना बाधित रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र सोशल मीडियावरील एका अफवेने सध्या पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान केले आहे. चिकन खाल्ल्यामुळे करोनाची लागण होते, या अफवेमुळे त्रस्त झाल्यानंतर आता राज्य शासनाच्या पशुसंवर्धना विभागाकडून चिकन फेस्टिव्हलचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली.

 

 

 

कोंबडीचे मांस खाऊन करोना होत नाही, हे वारंवार डॉक्टरांनी सांगूनही सोशल मीडियावरील अफवा काही थांबायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चिकन खाणे लोक टाळत आहेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे. अमरावतीमध्ये तर जिवंत कोंबडी १० ते १५ रुपयाला विकायची वेळ काही पोल्ट्री व्यावसायिकांवर आली आहे. या आर्थिक संकटातून पोल्ट्री व्यवसायाला बाहेर काढण्यासाठी मुंबई आणि नागपूरमध्ये चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्याची कल्पना पुढे आली.

यावर बोलताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले की, चिकन फेस्टिव्हल भरवत असताना ही अफवा कुणी पसरवली याचाही आम्ही शोध घेत आहोत. सायबर सेलकडे यासंबंधी तक्रार दाखल झाली असून आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे आयपी अॅड्रेस ट्रेस करण्यात आले आहेत. लवकरच या अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे केदार यांनी सांगितले.

 

First Published on: March 9, 2020 7:09 PM
Exit mobile version