एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री दालनात प्रवेश; दालनात बाळासाहेबांसह, दिघेंचा फोटो

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री दालनात प्रवेश; दालनात बाळासाहेबांसह, दिघेंचा फोटो

राज्यातील मोठ्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात प्रवेश केला. मंत्रालयातील प्रवेशद्वार आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि आनंद दिघेंची प्रतिमा मुख्यमंत्री यांच्या खुर्चीच्या मागे आता लावण्यात आली आहे. शिंदे गट हीच बाळासाहेबांची शिवसेना हे ठासवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील पूजेसाठी शिंदे समर्थक आमदारही उपस्थित आहेत. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर असे आमदार मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले आहेत. मंत्रायलात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी आमदार सदा सरवणकर म्हणाले की, मुख्यमंत्री आज मंत्रालयातील कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. आम्हाला याचा आनंद आहे. सर्वजणांना बोलवण्यात आले आहे.  त्यापैकी ज्यांना शक्य आहेत ते येतील. इतर आमदार मतदारसंघात आहेत, असे त्यांनी सांगितले.

First Published on: July 7, 2022 11:31 AM
Exit mobile version