पुण्यातील रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकाश आमटेंची केली विचारपूस

पुण्यातील रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकाश आमटेंची केली विचारपूस

पुणे : शिवसेनेतील संघर्ष न्यायालयाबरोबरच रस्त्यापर्यंत पोहोचलेला असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ आणि श्रेष्ठांच्या भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पुण्यातील रुग्णालयात जाऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन विचारपूस केली.

शिवसेनेमध्ये बंडाचा झेंडा फडकावून भाजपासोबत सरकार स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ व्यक्तींची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आठ शिलेदारांपैकी हयात असलेल्या मनोहर जोशी आणि लिलाधर डाके या दोन शिलेदारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काल पुण्यात भाजपा खासदार गिरीश बापट तसेच डॉ. प्रकाश आमटेंची दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची चौकशीी केली.

हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ ठरतील, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होत. या दरम्यान, यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ. आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटुंबीयांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी डॉ. आमटे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते.

भाजपचे नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी देखील याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. त्यांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी आमदार उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे उपस्थित होते.

हेही वाचा – मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’चे महत्वाचे दोन निर्णय; बस पाससह डबल डेकर ई – बस सेवा

First Published on: August 3, 2022 12:14 PM
Exit mobile version