मुख्यमंत्री शिंदे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करणार, संजय राऊतांना उत्तर देणार?

मुख्यमंत्री शिंदे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी महामंडळाची स्थापना करणार, संजय राऊतांना उत्तर देणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच रिक्षा- टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत, माजी महापौर नरेश म्हस्के आणि डॉ श्रिकांत शिंदे याच्यावर हे महामंडळ तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी रिक्षावाला, पान टपरीवाला, वॉचमन आशी टीका शिंदे गटातील काही आमदारांवर केली होती. या टिकेला उत्तर म्हणून या घटकांची प्रगती करण्यासाठी शिंदे सरकार महामंडळ आणि योजना सुरू करणार असल्याचे समजते आहे.

रिक्षा-टॅक्सी महामंडळा द्वारे या सुविधा मिळणार –

परिवहन किंवा कामगार विभागाच्या अंतर्गत महामंडळ

राज्यात साडेआठ लाख रिक्षा

1 लाख 20 हजार टॅक्सी

60 वर्षांनंतर चालकांना निवृत्ती वेतन

महिलांना प्रसुतीसाठी मदत

चालकांसाठी वेगळे हॉस्पिटल

संजय राऊतांनी काय केली होती टीका –

गुलाबराव पाटील आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र, ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी दहिसर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात केली. संदिपान भुमरे यांना पहिले तिकीट मिळाले होते, तेव्हा ते पैठणच्या साखर कारखान्यात वॅाचमन होते. मोरेश्वर सावेंचे तिकीट कापून बाळासाहेबांनी साधा शिवसैनिक म्हणून त्यांना तिकीट दिले होते, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची टीका –

रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले, त्यांनीच त्यांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचे पुण्य कमावले, त्यांना ते कमवू द्या. साधी माणसे, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले… या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी माणसात आणलं, आमदार, खासदार बनवले, मंत्री बनवले. मात्र, हे लोक मोठे झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिले ते नाराज झाले. पण ज्यांना काहीच दिले नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

First Published on: July 19, 2022 5:12 PM
Exit mobile version