Poladpur Old Bridge : ब्रिटिशकालीन पूल झाडांमुळे कमकुवत?

Poladpur Old Bridge : ब्रिटिशकालीन पूल झाडांमुळे कमकुवत?

पोलादपूरच्या ब्रिटिशकालीन पुलाचे वास्तव

बबन शेलार : आपलं महानगर वृत्तसेवा

पोलादपूर : महाबळेश्वर राज्यमार्गावरील आडगावाजवळ दीडशे वर्षांच्या पुलावर झाडे वाढली आहेत. यामुळे पूल आणखी कमकुवत होऊ शकतो. मात्र, या पुलाकडे सरकारचे किंबुहुना सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर यांचे दुर्लक्ष झालेले दिसते. पोलादपूरपासून ८ किलोमीटरवर महाबळेश्वर राज्यमार्गावर जेथे अंबेनळी घाटमार्ग सुरू होतो त्या आडगाव हद्दीत घोडवनी नदीवर अंदाजे १०० फूटाचा हा दगडी चिऱ्यांच्या बांधणीचा पूल आहे.

या पुलावर उंबराची झाडे उगवली असून झाडांनी मुळे धरल्याने पूल कमकुवत होऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रतापगडाच्या पायथ्याच्या बाजूला पोलादपूरमधील हा घाटमार्ग येतो. तालुक्यात इतर भागांपेक्षा या घाटभागात दरवर्षी प्रचंड प्रमाणावर पाऊस कोसळतो. कधी अतिवृष्टी होते. महाबळेश्वर राज्यमार्गावरील या अंबेनळी घाटमार्गाने रोज हजारो पर्यटक महाबळेश्वर, तापोळा धरण, पांचगणी अशा थंड हवेच्या ठिकाणी जातात. त्यामुळे पुलावर वाढलेली झाडांची मुळे दगडी बांधकामाच्या आत घुसून पुलाचे चिरे खिळखिळे करू शकतात, अशी भीती वाहनचालकांकडून व्यक्त होते.

हेही वाचा… Raigad Police Crime News : दानपेटी चोरांना रायगड पोलिसांच्या बेड्या

झाडांमुळे पावसाळ्यात पाणी झिरपून पुलाच्या बांधकामातील दगडी चिऱ्यात फट निर्माण होऊन चिरे निखळून पडण्याची दाट शक्यता स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास दगडी बांधकाम ढासळू शकते आणि दुर्घटना होऊ शकते, याकडे स्थानिक लक्ष वेधत आहेत. म्हणूनच पुलाच्या कमानीतून उगवलेले झाडे मुळापासून नष्ट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पुलाची पाहणी आणि स्ट्रक्टरल ऑडिट होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड तालुक्यातील नांगलवाडी येथील जुना पूल अतिवृष्टीत कोसळला होता. त्या दुर्घटनेनंतर जुन्या पुलांचे सरकारकडून ऑडिट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर-वाई-शिरूर या राज्यमार्गावरील या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

हेही वाचा… Raigad News : रायगडमधील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर अज्ञातांचा हल्ला; गाडीच्या फोडल्या काचा

इंग्रजांनी बांधलेला पूल

मुळात या घाटाचे बांधकाम इंग्रजांनी १८७१ ते १८७४ दरम्यान केले होते. त्यावेळी या घाट रस्त्याच्या बांधणीसाठी चार लाखांचा खर्च झाला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यसैनिक अंबाजी मालूसरे (साखरगाव) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पुलावर आंदोलन केले होते. या दगडी चिऱ्याने बांधलेल्या पुलाचे आयुष्य दीडशे वर्षांचे आहे. आजच्या घडीला या पुलाच्या कमानीखालचा पृष्ठभाग पावसाळ्यात वाहून गेला असून खड्डे पडले आहेत.

(Edited by Avinash Chandane)

First Published on: May 3, 2024 7:13 PM
Exit mobile version