ठाकरे IN फडणवीस OUT, निमित्त राज्यपालांचा वाढदिवस

ठाकरे IN फडणवीस OUT, निमित्त राज्यपालांचा वाढदिवस

ठाकरे सरकार विरूद्ध भगतसिंह कोश्यारी असा टोकाचा वाद संपुर्ण महाराष्ट्राने एकीकडे पाहिलेला असतानाच दुसरीकडे आज मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आज राजभवनाकडे वळाला. निमित्त होते ते म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वाढदिवसाचे. यावेळीही एक योगायोग पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रवेशाच्या वेळी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस बाहेर पडताना दिसले. फडणवीस बाहेर पडतानाच मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांच्या ताफ्याने राजभवनात प्रवेश घेतला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजभवन परिसरात यावेळी भेट झाली नसल्याचे दिसले. मुख्यमंत्री येण्याआधीच फडणवीस शुभेच्छा देऊन बाहेर पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या. आजच्या भेटीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील टोकाच्या विरोधाची भूमिका थोडीशी मवाळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

विधान परिषदेच्या राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री विरूद्ध राज्यपाल असा वाद एकीकडे टोकाला गेलेला आहे. या नियुक्त्यांवर राज्यपालांची भूमिका ही सत्ताधारी पक्षाकडून टिकेचा विषय राहिली आहे. पण त्याचवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी थोड नरमाईच धोरण घेतल्याचेही गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही व्यक्तीवर राग नसल्याचे सांगत राज्यपालांच्या बाबतीतली भूमिका थोडी मवाळ केली होती. त्यानंतर आज गुरूवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक वेगळा संदेश यानिमित्ताने देऊ केला आहे.

याआधी मुख्यमंत्र्यांनी पालघर दौऱ्याच्यावेळी राजभवनातील हॅलिपॅडचा वापर करणेही टाळल्याचे समोर आले होते. तसेच अनेक घटनांमध्ये राज्यपाल विरूद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष काही घटनांमधून समोर आला होता. मुळात शपथविधीपासूनच ठाकरे सरकार विरूद्ध राज्यपाल असा वाद पहायला मिळाला होता. शपथविधी दरम्यान अनेक मंत्र्यांनी शपथ नियमानुसार न घेतल्याने या वादाला सुरूवात झाली होती. त्यानंतर राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांचा विषय प्रलंबित असल्यानेही ठाकरे सरकारची राज्यपालांविरोधात नाराजी आहे. राज्यपालांकडून १२ आमदारांच्या नेमणुकीसाठीही याचिका ही उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिष्टचिंतन केले. आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर किशोरी पेडणेकर, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, नारायण राणे, अरविंद सावंत, यांनी देखील राज्यपालांना शुभेच्छा कळविल्या.

First Published on: June 17, 2021 2:53 PM
Exit mobile version