मुख्यमंत्री उद्या पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार; मराठा आरक्षणासह अनेक मुद्यांवर चर्चा करणार

मुख्यमंत्री उद्या पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार; मराठा आरक्षणासह अनेक मुद्यांवर चर्चा करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचं समजतंय. तसच कोरोना याशिवाय इतर मुद्द्यांवर देखील चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांची विनंती पंतप्रधान कार्यालयाने मान्य केली असून उद्या उद्धव ठाकरे दिल्लीला मोदींची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सोबत असणार असल्याचे सूत्रांकडून कळतंय.

उद्या होणाऱ्या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या भेटीत मराठा आरक्षणासह महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, जीएसटी परतावा यासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.

 

First Published on: June 7, 2021 4:00 PM
Exit mobile version