पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री

पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतानाच पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील, अशी कमिटमेंट करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या वाटाघाटींना आमच्यादृष्टीने काहीच अर्थ नसल्याचे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यात कोणताही वाटा किंवा घाटा होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

महापालिका व जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पाच दिवसांत उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेतला. रविवारी (दि.13) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली. सरकार काम करत असते पण पक्ष संघटनेला गती मिळावी, यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधावा लागतो. कोरोना असला तरी राजकारण थांबत नाही. सत्ता मागच्या पानावरून पुढे नेत असताना तुम्हाला संघटना बळकट करणे आणि संघटनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी दौरे करावे लागतात. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसारच शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत मोर्चा काढा

मराठा आरक्षण प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी बुधवारी (दि.16) कोल्हापूरमध्ये मोर्चा आयोजित केला आहे. याविषयी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, राज्यात मोर्चे काढून काहीच उपयोग होणार नाही. दिल्लीत मोर्चा काढला तर आम्ही देखील त्यात सहभागी होऊ. ‘एक मराठा, लाख मराठा’ ही ताकद संपूर्ण देशाला दाखवून देऊ. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून हा मुद्दा केंद्रीय पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संभाजी राजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तरी शिवसेनेला काहीच फरक पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार संजय राऊत उवाच

First Published on: June 13, 2021 11:59 PM
Exit mobile version