मोबाईल अभावी देहविक्री करणार्‍या महिलांची मुले शिक्षणापासून वंचित!

मोबाईल अभावी देहविक्री करणार्‍या महिलांची मुले शिक्षणापासून वंचित!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांकडून ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईतील रेडलाईट परिसरातील देहविक्री करणार्‍या महिलांची पालिका शाळेत जात असलेली मुले मोबाईल अभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात बाधा येऊ नये, म्हणूण मुंबईतील रेडलाईट परिसरातील देहविक्री करणार्‍या महिलांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी दैनिक आपलं महानगरशी बोलताना केली आहे.

मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आपत्कालीन परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांचे गेल्या पाच महिन्यांपासून प्रचंड हाल होत आहेत. मुंबईत आणि मुंबई उपनगरात जवळजवळ पन्नास हजार महिला देहविक्री व्यवसाय करतात. त्यांनासुद्धा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आज त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची झाली असून त्यांच्या मुलांना शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु कधी होईल याबाबत अनिश्चितता असली तरी महापालिका शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, या वर्गात मोबाईल अभावी ऑनलाईन शिक्षणापासून देहविक्री करणार्‍या महिलांची मुले वंचित राहत आहेत. लॉकडाऊन पूर्वी मुंबईतील कामाठीपुरा, जमुनामेशन, पाववाला स्ट्रीट, फॉकलंड रोड, गिरगांव, ग्रँड रोड, वरळी आणि शिवडी या परिसरात देहविक्री करणार्‍या महिलांची मुले पालिका शाळेत जात होती. या मुलांना शिक्षण विभागाच्या माध्यमातून वह्या, पुस्तके, पेन, पॅन्सिल, बुट वस्तुंचा पुरवठा करण्यात येत होता. तसेच समाज सेवी संस्थेच्या माध्यमातूनसुध्दा मोठ्या प्रमाणात मदत केली जात होती. मात्र, या कोरोना काळात या परिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे या मुलांच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष होत आहे.

मदतीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा

कामाठीपुरा या परिसरात देहविक्री करणार्‍या महिलांच्या मुलांची पालिका शाळेतील संख्या जवळ जवळ 180 आहे. तसेच या मुलांच्या विकासासाठी पालिकेकडून सामाजिक संस्थेची मदत घेतली जात असते. मात्र, या कोरोना काळात पालिकेचे या परिसरात सर्रास दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या परिसरातील पालिका शाळेतील विद्यार्थांचे भविष्य धोक्यात आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी शासनाने आणि पालिका प्रशासनाने पुढे येणे गरजेचे आहे. मात्र, ते दिसून येत नाही. अशी प्रतिक्रिया सोशल अ‍ॅक्टिव्हीटिज इंटिग्रेशन संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी दिली आहे.

मुलांचे भविष्य धोक्यात

कोरोनामुळे आमचा देहविक्री व्यवसास गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. आता अनलॉक सुरु झाला तरी ग्राहक परिसरात येत नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट आमच्यावर आले आहे. स्वतःचे आणि कुटुंबियांचे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत. समाजसेवी संस्थांकडून आलेल्या जेवणाचे पाकीट आणि राशन किट्सवर आतापर्यंत आम्ही दिवस काढले. मात्र, कोरोनामुळे आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे. आता पालिका शाळा विद्यार्थांचे ऑनलाईन वर्ग घेत असल्याने मोबाईल अनिर्वाय आहे. आमच्याकडे मोबाईल विकत घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. शासनाने आम्हाला या संकटकाळात मदत करावी, अशी प्रतिक्रिया दैनिक आपलं महानगरशी बोलताना देहविक्री करणार्‍या महिलेने दिली आहे.

रेड लाईट परिसरातील देहविक्री करणार्‍या महिला शिक्षित नाहीत. त्यांच्याकडे मोबाईल घेण्यास आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील देहविक्री करणार्‍या महिलांच्या मुलांच्या ऑनलाईन वर्गासाठी मोबाईल आणि शिक्षकांची सोय करावी.
– अलप्पा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, कामाठीपुरा
First Published on: August 28, 2020 9:22 PM
Exit mobile version