कोरोना योद्ध्यांसाठी सिडकोची घरे,एकनाथ शिंदेंची घोषणा

कोरोना योद्ध्यांसाठी सिडकोची घरे,एकनाथ शिंदेंची घोषणा

सिडको

कोरोना संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून सरकारी अधिकारी, पोलीस दलातील कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील अधिकारी सेवा बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सिडकोच्या माध्यमातून घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता “बुक माय सिडको होम योजना” जाहीर करण्यात आली असून या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

य़ा योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ८४२ सदनिका, अल्प उत्पन्न गटातील १३८१ सदनिका आणि पोलिसांसाठी अल्प उत्पन्न गटातील १४८२ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांची किंमत १९.८४ लाख ते २१.५६ लाख रुपये, तर अल्प उत्पन्न गटातील सदनिकांची किंमत २७.९४ लाख ते ३१.४३ लाख रुपये इतकी असणार आहे.

या योजनेत आरोग्यसेवा संबंधित कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा आणि कोषागारे, अन्न आणि नागरी पुरवठा, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी इत्यादींचा समावेश असणार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. कोरोनाचा सामना करताना योद्ध्याचा आकस्मिक मृत्यू झाला असल्यास त्याची पती/पत्नी अथवा वारसासही या घरांचा लाभ मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


हेही वाचा – Maharashtra lockdown 2021 : कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

 

First Published on: April 14, 2021 9:07 PM
Exit mobile version