प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथवर संचलन केलेला, साडेतीन शक्तिपीठ, नारीशक्ती चित्ररथ वणीत दाखल

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथवर संचलन केलेला, साडेतीन शक्तिपीठ, नारीशक्ती चित्ररथ वणीत दाखल

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती या चित्ररथाचे विशेष सादरीकरण १६ मार्च रोजी वणी गावात तर १७ मार्च रोजी आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंग गडावर होत असून कोल्हापूर, तुळजापूर व माहूर या तीन शक्तिपीठांत चित्ररथाचे सादरीकरण केल्यानंतर मंगळवारी (दि. १४) सायंकाळी आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंग (वणी) गडावर सादीरकरणासाठी वणी येथे दाखल झाला आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्थानिक व भाविकांनी चित्ररथ आवर्जून पाहावा, असे आवाहन केले आहे.

जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा द्वितीय क्रमांक मिळाला. साडेतीन शक्तिपीठावर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन वणी व सप्तशृंग गड येथे होणार असून या शक्तिपीठाच्या चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी, ता. १६ रोजी सकाळी ९ वाजता वणी येथे होणार असून श्री सप्तशृंगी मातेचे मुळस्वरुप समजले जाणार्‍या जगदंबा मातेच्या दरबारात चित्ररथ नेण्यात येणार आहे. तर शुक्रवार ता. १७ रोजी सप्तशृंग गडावर चिर रथाचे सादरीकरण होणार आहे. प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर यावर अधारित चित्ररथ होता. या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते. त्याच्या मागे साडेतीन शक्तिपीठं म्हणजेच, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर आणि वणी या साडेतीन शक्तिपीठांचा देखावा दाखवण्यात आला होता. ही सगळी शक्तिपीठे म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय. पोतराजसुद्धा चित्ररथात होते. एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती. चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना भेट देणार्‍या भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी हे प्रदर्शन वणी गाव व वणी गड येथे होणार आहे.

डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी वणीकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून सर्व नागरिकांनी व भाविकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वणी येथे चित्ररथ समिती वणीचे दर्शन दायमा, किरण तिवारी, पियुष भवर, भास्कर पाटील, चेतन कुर्‍हाडे, प्रशांत कड, बाळासाहेब घडवजे, मयूर जैन, सतिश जाधव, संतोष दुसाने, प्रमोद भांबेरे, मनोज थोरात, दिगंबर पाटोळे, आबा मोर आदी समिती सदस्य, वणी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद थोरात व विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी केले आहे.

First Published on: March 15, 2023 11:43 AM
Exit mobile version