शिवसेनेचे नखरे, तरीही युती होणारच! – मुख्यमंत्री

शिवसेनेचे नखरे, तरीही युती होणारच! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही? याची चर्चा सध्या फक्त मुंबई किंवा राज्यच नाही तर थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून युतीविषयी चर्चा करण्यासाठी ते पंतप्रधानांची देखील भेट घेणार आहेत. मात्र, त्याआधीच ‘युती होणारच’ असा दृढ विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नक्की कशाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांना युतीविषयी इतकी खात्री आहे हे कळू शकलं नसलं, तरी ‘युतीसाठी आम्ही काही फॉर्म्युले तयार केले आहेत. त्यामुळे युती होणारच’, असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं आहे. दिल्लीमध्ये लोकमतने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध मुलाखतकार रजत शर्मा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


हेही वाचा – जे नको ते मतदारांनीच नकारले – उद्धव ठाकरे

‘शिवसेनेचे तेवर भाजपला माहितीयेत!’

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या ‘तेवर’वर सूचक भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले, ‘शिवसेनेचे तुम्हाला दिसणारे तेवर फार वेगळे आहे. त्यांचे वेगळे तेवर आम्हाला माहिती आहेत. म्हणून त्यांच्यासाठी काही वेगळे फॉर्म्युले आम्ही तयार केले आहेत. शिवसेनेसोबत युती होणारच’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘तीन राज्यांत मोठा पराभव नाही’

दरम्यान, तीन राज्यांमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवावर देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी मतप्रदर्शन केलं. ‘पराभव आम्हाला मान्यच आहे. त्याचं परीक्षण केलं जाईल. पण हा पराभव फार मोठा नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये अवघ्या ०.५ टक्के मतांचा फरक होता’, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.


तुम्ही हे वाचलंत का? – २०१९ ला २०१४ पेक्षा जास्त जागा जिंकू – देवेंद्र फडणवीस

‘पुन्हा युतीची स्वप्न!’

भाजपसोबत युती न करता स्वबळाचा नारा देण्याचा निर्णय शिवसेनेने याआधीच जाहीर केला आहे. स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच एकला चलो रेचा निर्णय जाहीर केल्यामुळे सेना-भाजप विधानसभेत स्वतंत्र लढणार असल्याचंच सगळ्यांना वाटत होतं. मात्र, आता मुख्यमंत्र्यांकडे वेगळा फॉर्म्युला असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळे पुन्हा एकदा सेना-भाजप युतीची स्वप्न सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांना पडू लागली आहेत.

First Published on: December 13, 2018 7:22 PM
Exit mobile version